Navneet Rana । आगामी लोकसभा निवडणुकीची आज शनिवारी ३ च्या सुमारास घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग 543 लोकसभा मतदारसंघांसाठीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करणार आहे. त्यानुसार आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही 6 ते 7 टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
अशात भाजपने दुसरी यादी जाहीर करत महाराष्ट्रातील 20 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. मात्र अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा होत आहे. या दरम्यान गेल्या काही महिन्यापासून राजकीय वर्तुळात अशीही चर्चा होती की नवनीत राणा कमळ या चिन्हांवर लढणार आहे.
नवनीत राणा यांच्या उमेदवारी संदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत युवा स्वाभिमान पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर नवनीत राणा या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. भाजप सोबत झालेल्या चर्चेच्या प्रस्तावार बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
नमो युवा संमेलन ४ मार्चला नागपुरात पार पडला त्यावेळी एनडीएचे घटक म्हणून नवनीत राणा यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्या माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या होत्या, ‘आम्ही बोललो तरी चर्चा आणि नाही बोललो तरी चर्चा असते. त्यामुळे नेहमीच आम्ही चर्चेत असतो. आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो. गेल्या काही वर्षात बघितले तर आम्ही एनडीए सोबत असून अशा जर चर्चा होत असेल तर काही नवल वाटण्यासारखं नाही’ असेही ते म्हणाल्या होत्या.
अशात आता मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणे निश्चित आहे. नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढल्यास आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष खासदार नवनीत राणा यांना निवडणुकीत पाठिंबा देणार आहे. कालच आमदार रवी राणांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
हे वाचाल का ? ‘समाजाच्या शेवटच्या घटकाकडूनही गजर घडाळ्याचाच’ सुनेत्रा पवार यांची फेसबुक पोस्ट व्हायरल