न्हावरे – येथील करोना बाधित ज्येष्ठ महिला व पुरुष यांच्या हाय रिस्क संपर्कात आलेल्या जवळच्या ७ नातेवाईकांचे करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.
२० मे रोजी मुंबई वरून न्हावरे येथे आलेल्या ज्येष्ठ महिला व पुरुष यांना २७ मे रोजी करोना झाल्याचे करोना तपासणी अहवालात निष्पन्न झाले होते. या घटनेमुळे शिरूरच्या पूर्व भागात खळबळ उडाली होती. त्यामुळे करोनाचा वाढता धोका लक्षात घेता करोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील जवळच्या नातेवाईकांना न्हावरे येथील श्री.मल्लिकार्जुन विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले होते.
दरम्यान मंगळवारी (दि.०२) जवळच्या हाय रिस्क संपर्कातील संबंधित ७ नातेवाईकांचे घशातील द्रव (Swab) तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले होते. त्यांचे अहवाल आज (दि.०५) सायंकाळी निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे न्हावरे गावात भीतीचे वातावरण दूर झाले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तसेच हाय रिस्क व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे लो रिस्क व्यक्तींच्या तपासणीची आवश्यकता राहिलेली नाही. असे तालुका आरोग्य सहाय्यक सुरेश लवांडे यांनी सांगितले.