पिंपरी – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष निखील दळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले यांनी मुंबई येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आमदार सचिन अहीर यांच्या उपस्थितीत मातोश्रीसमोर दळवी यांचा पक्षात प्रवेश करवून घेण्यात आला.
शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी जवळीक साधली. त्यामुळे आकुर्डीतील शिवसेनेत पोकळी निर्माण झाली होती. त्यावर निखील दळवी यांच्या माध्यमातून आकुर्डी गावठाणासह परिसरात पक्षाचे काम करण्यासाठी नवीन कार्यकर्ता मिळाला आहे.
दळवी हे आकुर्डीचे दिवंगत माजी नगरसेवक जावेद शेख यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांनी युवक राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष पदाची धुरा देखील चांगल्या पध्दतीने सांभाळली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शहरप्रमुख भोसले यांनी त्यांना शिवसेनेचा उत्तम पर्याय निवडण्यासाठी मार्गदर्शन केले.
आज सकाळी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत दळवी यांचा पक्षप्रवेश करवून घेण्यात आला. आमदार अहिर यांनी दळवी यांच्या हाताला शिवबंधन बांधले. आकुर्डी गावठाणसह परिसरातील पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. नवीन तडफदार युवक दळवी यांच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे. दळवी हे दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील यात शंका नाही, असे शहप्रमुख ऍड. सचिन भोसले यांनी सांगितले.