श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी मूर्तींना घोडेउड्डाण येथे नीरा स्नान
वाल्हे – येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी मूर्तींना सोमवती अमावास्या निमित्त नीरा नदीत स्नान घालण्यात आले. वाल्हे येथील संत सावता महाराज मंदिरा असणारे श्री भैरवनाथांची काठी व कुंभारवाडा येथे असणाऱ्या श्री ग्रामदैवत यांच्या मूर्ती पालखीमध्ये ठेवून, मुख्य बाजारपेठेतून, वाजत-गाजत, गुलालाची मुक्त उधळण करीत, पारंपरिक ढोलांच्या तालावर उत्सवमूर्तींना गावांतर्गत पालखीची व श्रींच्या कावडीची पारंपरिक वाद्यांच्या तालावर सवाद्य मिरवणूक काढुन “नाथ साहेबाचं चांगभलं’ च्या जयघोषात’ ढोल-ताशा व सनईच्या तालावरती ग्रामप्रदक्षिणा मारून श्री भैरवनाथ मंदिरात आणण्यात आले.
मंदिर प्रदक्षिणा होऊन समाज आरती घेण्यात आले. यानंतर, मूर्तींना वीर येथील घोडेउड्डाण येथील नीरा नदीवर पवित्र स्नानासाठी नेण्यात आल्या. यावेळी, आडाचीवाडी येथील श्री काळ भैरवनाथ, तसेच मदनेवस्ती येथील मसनेर देवाच्या पालख्या, सुकलवाडी येथील पालखी वीर येथील घोडेउड्डाण येथे नीरा नदीवर मूर्तींना मानकरी, सालकरी तसेच ग्रामस्थांनी सहभागी होऊन, मूर्तींना दही-दुधाने अभिषेक घालून, उत्सवमूर्तींना जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी अनेक ग्रामस्थांनी घरातील देवांच्या मूर्तींना ही यावेळी नीरा नदी स्नानाला आणून जलाभिषेक घातला. पुजारी सचिन आगलावे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. स्नानानंतर, ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये समाजआरती झाल्यानंतर “नाथ साहेबाचं चांगभलं’ च्या गजरात गुलालाची उधळण करण्यात आली.
दरम्यान, मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर महाप्रसादाचा नैवैद्य घेऊन वाजत -गाजत मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. पालख्या पुन्हा गावाकडे मार्गस्थ झाल्या. दरम्यान, ग्रामदैवताच्या पालखीचे गावामध्ये आगमन झाल्यानंतर पालखी सोहळा मंदिरामध्ये नेताना भाविकांनी गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण केली. पहाटे ग्रामस्थांच्या हस्ते उत्समूर्तींना अभिषेक
करण्यात आला होता. त्यानंतर दर्शनासाठी गाभारा खुला करण्यात आला होता.
बाजरीच्या पेरणी करायची का नाही?
पावसाळ्याचे दिवस असतांनाही पाऊस का पडत नाही ? बाजरीच्या पेरणी करायची का नाही ? असे अनेक प्रश्न देवाच्या भाकणुकित देवाला विचारण्यात आले होते. दरम्यान, भाकणुकित देवाने सद्यःस्थितीत पाऊस नसल्याचे सांगितले आहे. यावेळी, पेरण्या रखडल्या असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.