Narendra Modi – गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे 5800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झाली. रेल्वे, रस्ते, पिण्याचे पाणी आणि सिंचन यासारख्या अनेक क्षेत्रांचा प्रकल्पांमध्ये समावेश आहे.
आधी गोविंद गुरुजींची पुण्यतिथी आणि नंतर सरदार पटेल जी यांची जयंती असल्याने 30 आणि 31 ऑक्टोबर या दोन तारखा प्रत्येकासाठी खूप प्रेरणादायी आहेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तत्पूर्वी आज अंबाजी मंदिरात दर्शन आणि पूजा केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
भारताची विकासगाथा जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानचे अलगद उतरणे आणि जी-20 च्या यशस्वी अध्यक्षतेचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला.
रस्ते, रेल्वे किंवा विमानतळ अशा आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाकडे नेणारी सर्व क्षेत्रांतील अभूतपूर्व गुंतवणूक पंतप्रधानांनी अधोरेखित केली. गुजरातच्या विकासासाठी नर्मदा आणि मही या नद्यांच्या पाण्याचा वापर करणाऱ्या सुजलाम-सुफलाम् योजनेवर त्यांनी प्रकाश टाकला.
जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी साबरमतीवर 6 बंधारे बांधले जात आहेत. या सिंचन प्रकल्पांमुळे उत्तर गुजरातमधील सिंचनाचे प्रमाण 20-22 वर्षांत अनेक पटींनी वाढल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले बनासकांठामध्ये बटाट्यांवर प्रक्रिया करण्यासाठी मोठे संयंत्र, मेहसाणा येथे बांधलेल्या ऍग्रो फूड पार्क सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन दशकांत उत्तर गुजरातमध्ये 800 हून अधिक नवीन ग्रामीण दुग्ध सहकारी संस्था स्थापन झाल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. दुधाव्यतिरिक्त, या दूध डेऱ्या शेतकऱ्यांच्या इतर उत्पादनांसाठीही महत्त्वाची प्रक्रिया केंद्रे बनत आहेत.
वाहन उद्योगाच्या विस्ताराबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मंडल-बेचराजी ऑटोमोबाईल हब विकसित केले जात असल्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढले आहे. बनासकांठा आणि साबरकांठा जिल्ह्यांमध्ये सिरॅमिक( चिनी माती संबंधित उद्योग) संबंधित उद्योग विकसित झाले आहेत, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
मेहसाणा आणि अहमदाबाद दरम्यानच्या रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉरमुळे उत्तर गुजरातमधील लॉजिस्टिक आणि साठवणुकीशी संबंधित उद्योग क्षेत्राच्या वाढीला अधिक बळकटी मिळेल, असेही ते म्हणाले.
गेल्या 9 वर्षांत अंदाजे 2,500 किमी पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकांचे काम पूर्ण झाले आहे. मोढेरा सूर्य मंदिर, प्राचीन संस्कृतीच्या खुणा उघड करणाऱ्या उत्खननाचा संदर्भ देत वडनगर हे संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
“हेरिटेज सर्किट’ अंतर्गत 1,000 कोटी रुपये खर्चून अनेक ठिकाणे विकसित केली आहेत. पाटणची “रानी की बाव’ही विहीर पाहण्यासाठी दरवर्षी सरासरी 3 लाखांहून अधिक पर्यटक येतात, अशी माहिती दिली.