नवी दिल्ली – क्रीडाक्षेत्रातील कुशल संघटक नरेंद्र बात्रा यांनी अखेर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदाचा तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणाने आपण हा निर्णय घेतल्याचे बात्रा यांनी या दोन्ही संघटनांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्याही सदसत्वाचा राजीनामा दिला आहे. एकाच व्यक्तीने एकाच वेळी तीन महत्वाच्या पदांवरून पायउतार होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने बात्रा यांना या पदांवर कार्यरत राहता येणार नाही असे आदेश दिले होते. त्याचाच हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती देण्याची मागणी बात्रा केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळली व अखेर बात्रा यांनी सोमवारी आपला राजीनामा या संघटनांकडे पाठवला. त्यांचा हा निर्णय मान्य करत या तीनही संघटनांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने बात्रा यांना अध्यक्षपदावरून डच्चू दिला होता. तसेच न्यायालयाने त्यांचे हॉकी इंडियाचे आजीवन सदस्यत्वही रद्द केले होते. बात्रा यांनी 2017 साली अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता.
माजी ऑलिम्पियन अस्लम शेर खान यांनी न्यायालयात याबाबत बात्रांच्या विरोधात याचिका दाखल केली होती आणि त्यावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने बात्रा यांना हटवले होते. बात्रा यांनी ऑलिम्पिक संघटनेचे आजीवन सदस्यत्व घेतले होते. भारत सरकारच्या नियमांनुसार क्रीडा महासंघाचा अधिकारी जास्तीत जास्त 10 वर्षे कोणत्याही पदावर राहू शकतो. असे असतानाही बात्रा यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याची तक्रारही अस्लम शेर खान यांनी न्यायालयात केली होती.