सासवड- शेतीच्या सातबाऱ्यावर महिलांचे नाव लावण्यासाठी महीला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुरंदरचे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
मासूम ही संस्था महिलांच्या संपत्तीच्या हक्कासाठी काम करत आहे. महिलांना शेतकरी म्हणून समाजात मान्यता मिळावी तसेच शेतीच्या वेगवेगळ्या योजनांचा महिलांना लाभ मिळावा, महिलांच्या नावाने शेती व्हावी म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून मासूम ही संस्था पुरंदर तालुक्यात काम करत आहे. तालुक्यात मासुमने एक अभियान घेतले होते, त्यामध्ये पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून शेतीवर लावावे यासाठी 1100 महिला व पुरुषांनी या अभियानामध्ये सही करून आपला सहभाग नोंदवला आहे.
सोमवारी (दि. 20) पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, मावडी, माळशिरस, पिंपरी या गावातून 25 महिलांनी पुरंदरच्या तहसीलदारांकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यासाठी या महिलांच्या पतीने आपल्या पत्नीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पुरुषांनी लक्ष्मीमुक्ती योजने अंतर्गत पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून लावण्यासाठी संमती देऊन नवीन विचार समाजापुढे ठेवला आहे. यावेळी मासूमच्या कार्यकर्ता मीना शेंडकर, शारदा कुंजीर, मंगल मगर उपस्थित होते