सोरतापवाडी – करोना बाधित दोन रूग्ण उरुळी कांचन येथे सापडल्याने व त्याचा प्रसार होऊ नये म्हणून नायगाव व सोरतापवाडी या भागांच्या हद्दी सील करण्यात येणार असल्याचे परिपत्रक उपविभागीय दंडाधिकारी सचिन बारवकर यांनी काढले आहे. त्यानुसार हा परिसर दि. 24 रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील करोना व्हायरस पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या विचारात घेता, येत्या काळात हवेली तालुक्यातील रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने काही भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरणाऱ्यांवर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे नायगाव व सोरतापवाडी या गावांच्या हद्दी सील करण्यात आल्या आहेत.
या परिसरांच्या हद्दीमध्ये पुढील आदेशांपर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात येत आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येकाला तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.