पुणे -पीएमपी बसमध्ये लवकरच पेमेंट ऍपद्वारे ऑनलाइन तिकीटाचे पैसे स्वीकारले जाणार आहेत. येत्या दोन दिवसांत पीएमपीच्या एका बसमध्ये प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास एक एप्रिलपासून सर्व बसमध्ये ही सेवा सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पीएमपीच्या 369 मार्गांवर सरासरी 1 हजार 600 बसमार्फत सेवा दिली जाते. तिकीट काढण्यासाठी सुटे पैसे नाहीत म्हणून पीएमपी बसमध्ये वाहक आणि प्रवाशांमध्ये रोजच वाद होत असतात. पण, सुट्या पैशावरून होणारे वाद आता टळणार आहेत.
पीएमपीकडून दोन वर्षांपासून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू होते. मात्र त्यात वारंवार अडथळे येत होते. पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पदभार स्वीकारताच पुढाकार घेऊन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
पीएमपीत पेमेंट ऍपद्वारे तिकिटाचे पैसे स्वीकारले जाणार आहेत. यासाठीचे सिक्युरिटी ऑडिट पूर्ण झाले असून, पुढील दोन दिवसांत याची एका बसमध्ये प्राथमिक चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर इतर बसमध्ये ही सेवा सुरू केली जाईल.
– ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी