मोशी, (वार्ताहर) – चर्होलीचे ग्रामदैवत वाघेश्वर महाराज यात्रा मंगळवारी (दि. 12) उत्साहात पार पडली. मंगळवारी यात्रेचा शेवटचा दिवस होता. या दिवशी चक्क एक नाग मंदिराच्या गाभार्यात असलेल्या पिंडीजवळ येऊन फणा काढून बसला होता. भाविकांनी नागोबाचे दर्शन घेतले. त्यामुळे नाग रूपाने वाघेश्वर महाराजांनी आपल्याला दर्शन दिले असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे. असाच प्रसंग मागील 56 वर्षांपूर्वी घडला होता.
मंगळवारी वाघेश्वर महाराज मंदिरात सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. मंगळवारी एक नाग वाघेश्वर महाराज मंदिरात आला. तो पिंडीवर थांबून राहिला. बराच वेळ भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर लाईफ प्रोटेक्शन अँड कंजर्वेशन ट्रस्ट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम भोसले यांना संपर्क साधण्यात आला. त्यांचे एक पथक मंदिरात दाखल झाले. सदस्यांनी नागाला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
अशाच प्रकारे वाघेश्वर महाराज मंदिरात 56 वर्षांपूर्वी ग्रामस्थांना नाग देवतेचे दर्शन झाले होते. सन 1968 मध्ये जुलै महिन्यानंतर मेघराजाने दडी मारली. शेतीवर अवलंबून असलेल्या या भागातील ग्रामस्थांचे पावसाअभावी मोठे हाल होऊ लागले. त्यामुळे ग्रामस्थांनी 20 ऑगस्ट 1968 रोजी डोक्यावर पाण्याचे हांडे घेऊन ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिरात देवाला पाण्याने अभिषेक घातला.
मेघराजाची कृपा व्हावी, अशी प्रार्थना सर्व ग्रामस्थांनी वाघेश्वर महाराजांकडे केली. आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी भरपूर पाऊस पडला. वाघेश्वर महाराजांनी भाविकांचे गार्हाणे ऐकले. पाऊस पडल्यानंतर ग्रामदैवताचे आभार मानण्यासाठी सर्व भाविक मंदिरात गेले असता मंदिरातील गाभार्यात एक नाग पिंडीला उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालत असल्याचे दिसले. सलग तीन दिवस हा नाग मंदिराच्या गाभार्यात होता. चौथ्या दिवशी नाग निघून गेल्याचे चर्होलीचे ग्रामस्थ सागर दाभाडे यांनी सांगितले.
वाघेश्वर महाराज मंदिरातील पिंड स्वयंभू असून चर्होलीसह पंचक्रोशीतील भाविकांची वाघेश्वर महाराजांवर मोठी श्रद्धा आहे. या मंदिराची उभारणी सन 1725 मध्ये दाभाडे सरकार घराण्यातील छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे सरदार कृष्णाजी दाभाडे यांनी केली आहे.