नगर -शहरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने आडते बाजार, डाळमंडई, सर्जेपुरा रस्ता, कोठला रस्ता, गंजबाजारच्या बाजूचा भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे.
त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ ही 12 जुलै पर्यंत म्हणजे तब्बल 14 दिवस बंद राहणार आहे. तसा आदेश महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी काढला आहे. त्यामुळे नगर शहराची लॉकडाऊन कडे वाटचाल सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
तोफखाना, नालेगाव, सिद्धार्थनगरसह आता शहरातील मुख्य बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कन्टेन्मेंट झोनमधील सर्व अंतर्गत रस्ते पत्रे लावून बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी कोंड्यामामा चौकातील हॉटेल राजेंद्र परिसरात प्रवेशद्वार ठेवण्यात येणार आहे. कन्टेन्मेंट झोनमधील सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, तर बफर झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील आस्थापना व दुकानेच चालू राहणार आहेत.
बफर झोन परिसर
शनिगल्ली, झेंडीगेट, पोखरणा हॉस्पिटल, सुभेदार गल्ली, नालबंदखुट, पिंजार गल्ली, पारशाखुंट, जुना कापडबाजार, गंजबाजार, मोचीगल्ली, सारडागल्ली, कापडबाजार, शहाजी रोड, तांबटकरगल्ली, तेलीखुंट पॉवर हाऊस, नाला मशिद, स्मिता मेडिकल, तेलीखुंट, सर्जेपुरा चौक, मनपा शाळा, बेलदार गल्ली, मक्का मशिद, जे. जे. गल्ली, कोंड्यामामा चौक, राज चेंबर, कोठला.