#नगर : एकाकी पडलेल्या शिवसेनेत दुफळी..!

-स्थायी समिती सभापती निवडणूक -विजय पठारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; एकट्या भाकरे उपस्थित

नगर – महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत नेहमीप्रमाणेच शिवसेनेला पुन्हा एकदा सत्तेतून बाहेर ठेवण्यात अन्य सर्व पक्षांना यश आल्याचे चित्र आहे. त्यातच एकाकी पडलेल्या शिवसेनेकडून स्थायी समिती सभापतीपदासाठी आज विजय पठारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. तिथेही शिवसेनेच्या स्थायी समितीमधील रिता भाकरे, या एकमेव सदस्या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित होत्या.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेनेचे अन्य पदाधिकारी किंवा स्थायी समितीमधील नगरसेवकही गैरहजर राहिल्याने एकसंघ (?) शिवसेनेत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून उमेदवारी कोण करणार? या मुद्यावर आधीच एकाकी पडलेल्या शिवसेनेतच पुन्हा एकदा दुफळी झाल्याचे मानले जात आहे.

सभापती निवडीसाठी काल दिवसभरात दोन अर्ज दाखल झाले. त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार अविनाश घुले यांचा अर्ज दाखल करण्यासाठी दस्तुरखुद्द महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित राहिल्याने संख्याबळाचे चित्र स्पष्ट झाले आहे. घुले यांच्या अर्जांवर बसपा व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सूचक आहेत अन् भाजप अर्ज दाखल करतेवेळी हजर. त्यातून शिवसेना एकाकी असल्याचे चित्र कालच स्पष्ट झाल्याने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी निवडणूक सोडून दिल्याचे सांगितले जाते.

असे आहे संख्याबळ…
राष्ट्रवादी (5) : अविनाश घुले, समद खान, प्रकाश भागानगरे, डॉ. सागर बोरुडे, परवीन कुरेशी
शिवसेना (5) : विजय पठारे, रिता भाकरे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, अप्पा नळकांडे
भाजप (4) : रवींद्र बारस्कर, वंदना ताठे, सोनाबाई शिंदे, मनोज कोतकर
बसपा (1) : मुद्दस्सर शेख, काँग्रेस (1): सुप्रिया जाधव.

आज निवडणूक..!
स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक उद्या (ता. 4) होणार आहे. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडणूक पार पडणार आहे. पीठसीन अधिकार्‍यांसमोर अगोदर उमेदवारी अर्जाची छाननी होईल. त्यानंतर वैध अर्ज घोषित होतील. माघारीसाठी दहा मिनिटांचा अवधी दिला जाईल. त्यानंतर एकापेक्षा अधिक अर्ज शिल्लक राहिल्यास निवडणूक प्रकीया राबविली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.