नगर -शहरात वाढत असलेल्या करोनामुळे कोविड उपचार सेंटरची गरज ओळखून महापालिका, भाजप व पंडित दीनदयाळ पतसंस्थाच्या वतीने पुढाकार घेत नटराज हॉटेलमध्ये मोफत उपचार केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे गरजू व गरीब रुग्णांना चांगले उपचार व सोयीसुविधा मिळत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार, दर्जेदार जेवणा बरोबरच सर्व दैनदिन अत्यावश्यक वस्तू मोफत उपलब्ध करून दिल्याने रुग्ण लवकर बरे होऊन घरी जात आहेत, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
महानगरपालिका, भाजप व पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने हॉटेल नटराज मध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधून 22 करोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, संघटन सरचिटणीस ऍड. विवेक नाईक, महेश नामदे, तुषार पोटे, संजय ढोणे, अजय चितळे, सतीश शिंदे, पी.डी. कुलकर्णी, शिवाजी दहींडे, गणेश साठे, श्रीकांत दराडे, निलेश चिपाडे, अमेय मुळे आदी उपस्थित होते.
यावेळी गंधे म्हणाले, करोना आजारावर मात करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे करोनावर मात केलेल्या रुग्णांनी नव्याने करोनाबाधित झालेल्या रुग्णांना मार्गदर्शन करावे. मनपा आरोग्य विभागाने रुग्णांची चांगली देखभाल घेतली आहे. मुनोत परिवाराचे नटराज हॉटेलची वास्तू या कोविड केअर सेंटरला उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.