Marathi Cinema : ‘नाळ’ चित्रपट २०१८ मध्ये चांगलाच सुपरहिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले, गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग २’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले.
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या गाण्यानंतर आता टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टिझरला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे.
‘नाळ’च्या पाहिल्याभागात विदर्भातल्या नदीचं विस्तीर्ण पात्र दिसलं होतं. त्या पात्रात पाणी कमी, आणि वाळवंट जास्त होतं. असं असूनही पडद्यावर विदर्भ कधी नव्हे इतका विलोभनीय दिसला होता. ती कमाल होती सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या कॅमेराची. तर अशा रखरखीत वातावरणातही माया करणाऱ्या माणसांच्या सावलीत चैतू घडत होता. आता ‘नाळ २’ मध्ये मोठा झालेला चैतू आपल्या खऱ्या आईला भेटायला पश्चिम महाराष्ट्रात आलाय.
या टीझरची सुरुवातीला छोटा चैतू धावत जाऊन आपल्या खऱ्या आईला छत्री देताना दिसतो. त्यानंतर आता चैतू हा मोठा झाला आहे आणि तो त्याच्या खऱ्या आईला सायकलवर बस असे सांगताना दिसत आहे. यानंतर त्याची खरी आई सायकलवर बसते. चैतू आई बसली की नाही याची खात्री करतो आणि तिला चालवू का असे विचारतो. यावेळी चैतू आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो, असे ‘नाळ २’ च्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
नाळ चित्रपटातील ‘जाऊ दे ना वं’ या पहिल्या भागातील लोकप्रिय गाण्यानंतर आता ‘भिंगोरी’ या गाण्यातून चैतूच्या या प्रवासाची सुरुवात बघायला मिळतेय. नात्यांमधले चढ-उतार आणि गुंता हा चैतूच्या अल्लड वयाला झेपेल का अशाच प्रश्न प्रेक्षकांना पडत असणार. १० नोव्हेंबर रोजी ‘नाळ’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तेव्हा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच.