दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क केवळ तीन ते चार रुपयांना
मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एन-95 मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण 19 ते 50 रुपयांत, तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळणार आहे.
यामुळे आता सामान्यांना परवडणाऱ्या अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला. समितीने निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासन मान्यतेनंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
राजेश टोपे म्हणाले, करोना साथीच्या आधी एन 95 मास्क 40 रुपयांना विकला जायचा. मार्चमध्ये हाच मास्क 40 वरून 175 रुपये एवढ्या चढ्या दराने विकला गेला. म्हणजे त्यांच्या दरात 437.5 टक्के एवढी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
करोना काळात राज्य शासनाच्या वतीने सामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वापरणे आणि सॅनिटायझरने हात धुवावेत, असे वारंवार आवाहन केले जात आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरला मोठी मागणी असून त्याचे दर नियंत्रित असावेत यासाठी आरोग्यमंत्री टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात आली होती.