हिंजवडी, (वार्ताहर) – महापालिकेच्या प्रभाग क्र. 26 मधील वाकड, पिंपळे निलख, विशालनगर भागातील रहिवाशांसाठी तीन दिवस मोफत आधार कार्ड अद्ययावत शिबिर घेण्यात आले. हे शिबिर रणजित (आबा) कलाटे फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आले. या शिबिरास प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जवळपास पाचशेहून अधिक नागरिकांनी मोफत आधार कार्ड शिबिरास भेट देत आपल्या आधार कार्डमधील दुरुस्त्या करून विनामूल्य नवीन स्मार्ट कार्ड मिळविले. रणजित (आबा) कलाटे फाउंडेशनच्या वतीने वाकड येथे स्नेहा कलाटे जनसंपर्क कार्यालयात हे शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे भाजपा प्रभारी संतोष कलाटे, फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे व रणजित कलाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये आधार कार्ड अद्ययावत करणे व नवीन आधार कार्ड काढण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाकडून मदत केली गेली. या भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांच्या आधार कार्डात त्रुटी असल्याने स्नेहा कलाटे यांच्या विशेष प्रयत्नाने आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले होते. विनामूल्य आधार कार्ड अपडेटची सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी स्नेहा कलाटे आणि फाउंडेशनचे आभार मानले.