“आत्मा मालिक’मुळे मुलांच्या जीवनाला कलाटणी : ठुबे  

कोपरगाव – आदिवासी मुलांच्या जीवनाला कलाटणी देण्याचे कार्य आत्मा मालिक शैक्षणिक क्रीडा संकुलाने केले आहे. आगामी काळात आदिवासी कुटुंब सक्षम करण्याची ताकद ओमगुरुदेव आत्मा मालिक यांच्या सहवासाने होणार आहे, अशी प्रतिक्रिया राजूर येथील आदिवासी विभाग प्रकल्पाचे प्रमुख संतोष ठुबे यांनी व्यक्ती केली.

कोपरगाव तालुक्‍यातील आत्मा मालिक शैक्षणिक, क्रीडा संकुलात गेल्या तीन दिवसांपासून आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील मुलांच्या राज्यस्तरीय कला, विज्ञान, गणित, क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील खेड्या-पाड्यांतून हजारो आदिवासी मुले-मुली आल्या होत्या. या मुलांनी आत्मा मालिक संकुलात विविध कला कौशल्याचे प्रदर्शन करुन सर्वांचे लक्ष वेधले. स्पर्धेचे उद्‌घाटन मंत्री बाळासाहेब थोरात व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

तीन दिवसांत आदिवासी विभागाच्या सात प्रकल्पांतील तीन हजार आदिवासी मुलांनी सहा सांघिक, 14 वैयक्तीक क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आदिवासी मुलांनी तयार केलेल्या हस्तकला प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही कला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. आदिवासींच्या पारंपरिक जीवनशैलीचा वेध घेणारे हे प्रदर्शन लक्षवेधी ठरले. आदिवासींच्या दैनंदिन जीवनावर आधारित तयार केलेल्या वस्तू, नैसर्गिक वनस्पतींपासून आकर्षक वस्तू तयार केल्या होत्या. गवताच्या काड्यांपासून आकर्षक दागिने, घरटे, टाकाऊ वस्तूपासून शोभेच्या वस्तू सर्वजन कौतुकाने पाहात होते.

आदिवासी मुलांची खेळातील चपळाई, चिकाटी, जिद्द यामुळे त्यांच्या क्रीडा स्पर्धा लक्षवेधी ठरल्या. रात्री आदिवासी मुलांच्या आदिवासी नृत्य, कला, सांस्कृतिक कार्यक्रमाने वेगळी रंगत वाढविली होती. आत्मा मालिक आश्रमाचे आत्मा मालिक माऊली, संत परमानंद महाराज यांनी आदिवासींच्या मुला-मुलींचे विशेष कौतुक करुन त्यांच्या भावी जीवनाला शुभेच्छा दिल्या. आत्मामालीक ध्यानपीठाचे संत निजानंद महाराज व संत मांदियाळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, व्यवस्थापक हिरामन कोल्हे, विश्‍वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, तसेच आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे सर्व प्राचार्य व विमाग प्रमुख यांनी तीन दिवसीय आदिवासी मुलांच्या स्पर्धेसाठी योग्या सुविधा देऊन सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.