विविधा: संगीतकार मदनमोहन

माधव विद्वांस

मदनमोहन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकारांपैकी एक लोकप्रिय संगीतकार होते. त्यांचा जन्म 25 जून 1924 रोजी इराकची राजधानी बगदाद येथे झाला. त्यांचे वडील राजबहादूर चुनीलाला हे चित्रपट व्यवसायाशीसंबंधित होते. ते फिल्मिस्तान व मुंबई टॉकीजमध्ये काम करायचे. मदनमोहन यांना अभिनेता व्हायचे होते.त्यांची पहिली फिल्म 7/8 रिळे झाल्यावर बंद पडली. त्यानंतर त्यांनी शहीद आणि मुनीमजी या चित्रपटांत भूमिका केल्या. 25 वर्षांच्या त्यांच्या संगीत कारकिर्दीमध्ये 100च्या वर चित्रपटांच्या गीतांना त्यांनी संगीत दिले. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांच्यातील बुद्धिमत्तेची जाणीव त्यांच्या घरच्यांना होतीच. त्यांच्या वाढदिवसाला घरच्यांनी त्यांना एक छोटा ड्रम भेट दिला होता. त्याच दिवशी रस्त्यावर इराकी पोलीस बॅंडसह संचलन करीत घरासमोरून चालले होते. छोटा मदन त्यांच्यात सामील झाला.

शालेय शिक्षण संपल्यावर त्यांना संगीत रचना करायच्या होत्या, पण वडिलांच्या सांगण्यानुसार ते डेहराडूनच्या सैनिकी शाळेत दाखल झाले. सन 1943 मधे सैन्यात सामील झाले आणि दोन वर्षांसाठी (दुसरे महायुद्ध समाप्त होईपर्यंत) बंगलोर येथे स्थायिक झाले. त्यांचेकडे असलेला टेपरेकॉर्डर ते खूप काळजीने वापरत असत. सतार हे त्यांचे आवडते वाद्य होते. पण त्यांना ती वाजवता येत नसे म्हणून उस्ताद शमीम अहमद यांचेकडून त्यांनी सतार शिकायला सुरुवात केली होती.त्यांनी संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांचे सहाय्यक म्हणून बॉलीवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

त्यांनी सन 1950 मध्ये “आँखें’ या चित्रपटासाठी पहिल्यांदाच संगीत दिले.प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या चित्रपटाने त्यांना चांगले यश दिले. अदा, अदालत, अनपढ, आशियाना, गेट वे ऑफ इंडिया, दस्तक, दुल्हन एक रात की, देख कबीरा रोया, धून, नीला आकाश, भाई भाई, मेरा साया, मौसम, रेल्वे प्लॅटफॉर्म, लैला मजनू, वह कौन थी, वीर झारा, शराबी, संजोग, हकीकत अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. जरी त्यांनी अनेक गायकांबरोबर काम केले असले तरी प्रामुख्याने लता मंगेशकर यांच्याबरोबरचे त्यांचे संगीत प्रभावी ठरले. लता मंगेशकरबरोबरची संगीतसाथ त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत होती. संजोग, नीला आकाश या चित्रपटांतील गाणी भावपूर्ण होती.

70 च्या दशकामधे चिराग, दस्तक, हीर रांझा सारख्या चित्रपटांमधील गाणी मदन यांनी सादर केली तेव्हा ते यशाच्या शिखरावर पोहोचले. त्यांच्याकडे निर्मात्यांची मागणी वाढली. त्यांनी ऋषिकेश मुखर्जी, गुलजार आणि राजिंदरसिंह बेदी यांच्याबरोबरही काम केले. वर्ष 1970 मध्ये दस्तक चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.तो त्यांच्या आयुष्यातला एकमेव मोठा पुरस्कार होता. मदनमोहन खूपच अल्पायुषी ठरले, त्यांचे वयाच्या 51व्या वर्षी 14 जुलै 1975 रोजी मुंबई येथे यकृताच्या आजाराने निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.