इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी लष्करी हुकुमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी आज आपल्याविरोधातील देशद्रोहाच्या खटल्याच्या निकालाला आव्हान दिले. या खटल्याच्या निकालामध्ये मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांच्या अनुपस्थितीतच सहा वर्षांपासून चाललेल्या या प्रकरणाचा निकाल सुनावला होता.
मुशर्रफ यांनी आज ऍड. अझहर सिद्दीक यांच्या माध्यमातून लाहोर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये कोणत्याही प्रांतिय सरकार किंवा कोणाही व्यक्तीला प्रतिवादी केले गेलेले नाही, असे पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे. विशेष न्यायालयाने सुनावलेल्या निकालामध्ये परस्पर विसंगती असल्याचा आरोप केला आहे. विशेष न्यायलयाने घाईघाईने आणि अत्यंत घिसरडघाईने या प्रकरणाची सुनावणी गुंडाळली. त्यानिकालामध्ये कोणताही निष्कर्श निघू शकलेला नव्हता, असेही मुशर्रफ यांनी म्हटले आहे. देशाच्या हिताला बाधक अशी कोणतीही कृती आपण केलेली नव्हती, ही बाब विशेष न्यायालयाने विचारात घेतली नव्हती. आपल्याविरोधात सादर केलेल्या कोणत्याही पुराव्यांच्या आधारे देशद्रोहाचा आरोप सिद्ध होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश मझहीर अली अकबर नक्वी यांच्या अध्यक्षतेखालील पिठासमोर मुशर्रफ यांच्या याचिकेची सुनावणी 9 जानेवारीला होनार आहे.
विशेष न्यायालयाने दिलेला निकाल स्थगित ठेवण्याची विनंतीही मुशर्रफ यांनी केली आहे. याच विशेष न्यायालयाच्या स्थापनेलाही मुशर्रफ यांनी लाहोर उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आपल्या अनुपस्थितीत या विशेष न्यायालयाने निकाल सुनावण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणीही मुशर्रफ यांनी एका याचिकेद्वारे केली होती. निकाल सुनावल्यानंतर तीन दिवसांनी मुशर्रफ यांनी या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.