आधार कार्ड पेटीएमला लिंक करण्याच्या बहाण्याने होतेय फसवणूक

ऑनलाईन फ्रॉडच्या नव्या पद्धतीने अनेकांना गंडा

पुणे – तुमचे आधार कार्ड पेटीएमला लिंक करा अन्यथा येत्या चोवीस तासात तुमचे पेटीएम बंद होईल असा फोन किंवा मेसेज तुम्हाला येईल त्याविषयी पुर्ण सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली असून त्या आधारे लोकांच्या खात्यावरील पैसे ऑन लाईन काढून फसवणूक करण्याचा नवीन प्रकार सध्या सुरू झाला आहे. पुण्यातही अशा प्रकारे काहींची फसवणूक झाली आहे.

या संबंधात फसवणूक झालेल्या एका महिलेने सांगितलेली हकिकत अशी की सदर महिलेला असाच फोन आला होता. हा फोन आधार केवायसीच्या नावानेच आला असल्याचे कॉलर आयडीवरून दिसते. त्यामुळे लोक सहज विश्‍वास ठेवतात आणि अलगद त्याच्या जाळ्यात फसतात. सध्या बॅंक खाते आधारला लिंक करण्याची सरकारी सक्ती आहे. ही सक्ती आता पेटीएमलाही लागू झाली असावी असा समज सहज निर्माण होतो व लोक हे पेटीएमला आधार कार्ड लिंक करण्यास तयार होतात. त्यासाठी केवळ एक रूपया चार्ज आकारला जात असल्याचे संबंधीताकडून लोकांना सांगितले जाते. हा एक रूपया क्रेडीट कार्डाद्वारे संबंधीत खात्यात भरण्यास सांगितले जाते. व त्यासाठी कार्डाचा तपशील मागितला जातो. एक रूपयाने काहीही फरक पडत नाही अशा भ्रमात असलेल्या लोकांची बॅंक खाती त्यातून नंतर क्षणार्धात साफ केली जातात. या महिलेलाही असाच अनुभव आला असून तिने एक रूपया वर्ग केल्यानंतर त्या महिलेच्या खात्यातून तब्बल 75 हजार रूपयांची रक्कम केवळ काही मिनीटात गायब करण्यात आली आहे. संबंधीत फोनवर नंतर कॉल केल्यानंतर तो उचलला जात नाही. कानडी भाषेत त्यावर काही तरी रेकॉर्डेड मेसेज येत असल्याने कर्नाटकातून कोठून तरी हे प्रकार सुरू असल्याचे लक्षात येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.