रायगड – रायगड जिल्ह्यातील माणगांवमध्ये छोट्या हरणासारखा प्राणी दिसत असल्याचे आढळून आले. याठिकाणी वनविभागाची टीम बोलावण्यात आली. त्यानंतर तातडीने वन्यजीव अभ्यासक शंतनू आणि त्याचा सहकारी मित्र शुभांकर तेथे पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता हा प्राणी माउस डियर मराठीत मूषक हरीण किंवा पिसोरी म्हणून ओळखले जाणारे हरिण असल्याचे समजले.
यामुळे सर्वांनाच धक्का बसला. हा दुर्मीळ प्राणी असून, त्याच्या सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. पहिल्या दिवशी माणगाव बाजारपेठेत हा प्राणी दिसून आला. माष हा परिसर खूप मोठा असल्याने या छोट्याशा प्राण्याचा शोध घेणे शक्य नव्हते. तरीसुद्धा स्थानिकांमध्ये जागृती करून हा प्राणी पुन्हा दिसल्यास जवळ न जाता त्वरित कळविण्याचे आवाहन करत वनरक्षक त्या ठिकाणाहून परतले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हा प्राणी त्याठिकाणी आला असल्याची माहिती कृष्णाभाई गांधी यांनी दिली. हा एक दुर्मीळ प्राणी आहे. बचावकार्यादरम्यान हे पिसोरी हरीण चक्क बाजारपेठेतील कपड्यांच्या दुकानात शिरले. तिथे शंतनु कुवेसकर यांनी प्रयत्नांनंतर त्या हरिणाला हळुवारपणे पकडून वनविभागाची टीम दाखल होईपर्यंत दुकानात ठेवले.
हरीण संपूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री करून वनविभागामार्फत काळजी घेत या मादी पिसोरी हरणास जवळच्याच नैसर्गिक जंगलाच्या अधिवासात सोडण्यात आले आहे. पिंजऱ्याचे दार उघडताच मोकळा श्वास घेत पिसोरी हरीण आपल्या मार्गाने जंगलाच्या दिशेने निघून गेले.