मुंबई – करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. 28 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबत अभिनेत्री कंगणा राणावतने प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने करण जोहरवर संताप व्यक्त करत त्याला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.
कंगणाने इनस्टा स्टोरी शेअर करत लिहिले की, “भारतीय प्रेक्षक अण्वस्त्र निर्मिती आणि अणुविज्ञानावर आधारित 3 तासांचा चित्रपट पाहत आहेत आणि येथे नेपोटिझम गँगची तीच सासू आणि सून रडगाण्याची स्टोरी, पण खरंच 250 कोटींची गरज काय आहे? करण जोहर तुला लाज वाटली पाहिजे की तू एकसारखाच चित्रपट अनेकदा बनवत आहे. तू स्वतःला भारतीय चित्रपटसृष्टीचा ध्वजवाहक म्हणतो. पैसे वाया घालवू नको, हा चित्रपटसृष्टीसाठी कठीण काळ आहे.” यावेळी कंगणाने करणला तु निवृत्त हो आणि नवीन चित्रपट निर्माते येऊ दे जे चांगले आणि नवीन चित्रपट बनवतील, असा सल्लाही दिला आहे.
करण जोहरसोबतच कंगनाने रणवीरला देखील सल्ला दिला आहे. आणखी एक पोस्ट लिहीत रणवीरला कंगनाने म्हंटले की, “रणवीरने करण जोहर आणि त्याच्या ड्रेसिंग सेन्सकडून प्रभावित होऊ नये. त्याने सामान्य माणसासारखे कपडे घालावेत, जसे त्यांच्या काळात धरम जी आणि विनोद खन्ना घालायचे. भारतीय लोक स्वतःला हिरो म्हणवणाऱ्या कार्टून दिसणाऱ्या माणसाला ओळखत नाहीत, प्लीज साऊथच्या सर्व हिरोंना पाहा की ते कसे कपडे घालतात.” दरम्यान, रणवीर त्याच्या अभिनयासह त्याच्या अतरंगी स्टाइलसाठी देखील ओळखला जातो. यावरूनच कंगणाने रणवीरला हा सल्ला दिला आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील पाहायला मिळत आहेत.