सांगली – सांगलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादीचे कुपवाड शहर उपाध्यक्ष आणि लेबर कॉंट्रॅक्टर दत्तात्रय पाटोळे यांची पाठलाग करून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. भरदुपारी घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे.
हा प्रकार कुपवाड एमआयडीसी परिसरात रोहिणी ऍग्रोटेक कोल्ड स्टोअरेजमध्ये घडला. पाटोळे गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादीच्या कुपवाड शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. दत्तात्रय पाटोळे शुक्रवारी दुपारी दुचाकीवरून कुपवाडहून सांगली शहराकडे निघाले होते.
दुपारी एकच्या सुमारास मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये रोहिणी कोल्ड स्टोअरेजजवळ त्यांना तिघा अज्ञातांनी अडवले. दुचाकी थांबताच हल्लेखोरांनी चाकू, चॉपर आणि कोयत्याने पाटोळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
पाटोळे जीव वाचवण्यासाठी जवळच्याच रोहिणी कोल्ड स्टोअरेजच्या दिशेने पळाले. मात्र, हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांना गाठले. त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार करून हल्लेखोर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरदिवसा राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्याचा खून झाल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.