पिंपरी- चार वर्षांपूर्वी दोघांनी एका अनोळखी व्यक्तीचा अवघ्या दोनशे रुपयांसाठी खून केला होता. हा प्रकार 24 जानेवारी 2017 रोजी सकाळी निरझरा पार्क सोसायटी समोरील मोकळ्या जागेत रहाटणी येथे घडला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींना वाकड पोलिसांनी चार वर्षानंतर अटक केली आहे. मात्र खूनातील मयताची अद्यापही ओळख पटलेली नाही.
अंकुश दिलीप खडसे (वय 30, रा. भारतमाता चौक, काळेवाडी), विष्णू देवराव चित्ते (वय 31, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे दारू प्यायला बसले होते. त्यावेळी मयत व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत आरोपींजवळ आला. त्याने आरोपींकडे दारूची मागणी केली. आरोपींनी त्याला खाली बसवून दारू प्यायला दिली.
दारू पिल्यानंतर तिघेजण विष्णू याच्या दुचाकीवरून पिंपरी स्मशानभूमीजवळ गेल्यावरून आरोपींनी मयताची झडती घेतली. त्याच्या खिशातून 200 रुपये काढून घेतले. त्यावेळी मयताने आरोपींना प्रतिकार केला. त्यानंतर आरोपींनी मयत व्यक्तीला दुचाकीवरून निरझरा पार्क सोसायटी समोरील मोकळ्या जागेत रहाटणी येथे नेले. त्याच्या डोक्यात, मानेवर, हनुवटीजवळ फरशीने मारून खून केला.
या गुन्ह्याचा तपास वाकड पोलीस मागील चार वर्षांपासून करीत होते. पोलीस नाईक नितीन गेंगजे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी येथील केएसबी पंप कंपनीसमोरून आरोपी अंकुश याला अटक केली. तसेच याचा साथीदार विष्णू याला आळंदी येथून अटक केली.
दारूनेच फोडले आरोपींचे बिंग
दारू पिऊन आरोपींनी एकाचा खून केला. त्यानंतर चार वर्षांनी दारू प्यायल्यावर आपण केल्या खूनाबाबत बडबड केली आणि ही बडबड पोलिसांपर्यंत पोहोचली. वाकड पोलिसांना आरोपींचा सुगावा काढत अखेर त्यांना गजाआड केले.