पिंपरी – प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि महाराष्ट्र दिन या दिवशी पोलीस ग्राऊंडवर परेड होत असते. मात्र पिंपरी चिंचवड शहरात पोलीस परेड ग्राऊंड नाही. सध्या मोशीत 10 एकर जागा पोलिसांकरिता उपलब्ध झाली आहे. मात्र पोलीस परेड ग्राऊंड होण्यासाठी पोलिसांना आणखी तीन वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), स्वातंत्र दिन (15 ऑगस्ट) संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. दिल्ली येथील लष्कराच्या तीनही दलातील कवायती आणि प्रात्याक्षिक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तसेच महाराष्ट्र दिन (1 मे) रोजी संपर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी देखील जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस परेड होते. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना यावेळी मानवंदना दिली जाते. प्रत्येक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतही पोलीस परेड ग्राऊंडवर या दिवशी परेड केली जाते.
पिंपरी-चिंचवड हे स्वतंत्र शहर असतानाही अनेक बाबींमध्ये पुण्यावर अवलंबून आहे. तसाच काहीसा प्रकार पोलिसांबाबतही आहे. तीन वर्षांपूर्वीपर्यंत हे शहर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होते. एवढ्या मोठ्या शहरात पोलिसांना परेडसाठी ग्राउंड इतक्या वर्षांमध्ये काहीही व्यवस्था करण्यात आली नाही. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना तर केली परंतु तीन वर्षांनंतरही अनेक आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली नाही. त्यापैकी परेड ग्राउंड देखील आहे. आता कुठे यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास येत्या 15 ऑगस्ट रोजी तीन वर्ष पूर्ण होत आहे. मात्र पोलीस आयुक्तालय, मुख्यालय आणि इतर विभागासाठी अद्यापही स्वतंत्र जागा नाही. यामुळे राष्ट्रीय सणांच्या दिवशी शहरात परेडच होत नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिसांकरिता स्पाईन रोड मोशी येथे दहा एकर जागा देण्याची घोषणा केली.
मात्र सर्व शासकीय नियम व अटींची पूर्तता केल्यानंतर ही जागा पोलिसांकडे सुपूर्द केली जाणार आहे. त्यानंतर अर्थ विभागाकडून आयुक्तालय व मुख्यालयाच्या उभारणीसाठी निधी मंजूर केल्यावर या जागेचा नकाशा तयार करून अंदाजपत्रक काढण्यात येणार आहे.
कितीही वेगाने याबाबतची फाईल शासनाच्या विविध विभागात फिरविली तरी प्रत्याक्षात पोलीस परेड ग्राऊंडच्या निर्मितीसाठी किमान तीन वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.