कुख्यात गुंडांनी एकाला संपवले..
इस्लामपूर (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीमुळे कुख्यात गुंडांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष रखमाजी कदम (वय २४ रा. निनाईनगर इस्लामपूर) याचा चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी अजित हणमंत पाटील (वय २८)
रा. शिवाजी चौक इस्लामपूर ,सुरज उर्फ पांड्या अशोक जाधव (वय २६ ) रा. उदय चौक इस्लामपूर , प्रतिक उर्फ पिल्या सुरेश पाटील ( वय१९) रा. अजिंक्यनगर इस्लामपूर याना पोलिसांनी अटक केली. तर अन्य तीन अनोळखी इसमांविरोधात खूनाचा गुन्हा इस्लामपूर पोलिसात नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इस्लामपूर-निनाईनगर येथील संतोष रखमाजी कदम हा रविवार दि. २८ जून रोजी रात्री ११:३० सुमारास एमआयडीसी परिसरातून जेवण करून बहे नाका येथून दुचाकीवरून घरी निघाला होता. यावेळी संतोषची दुचाकी अजित हणमंत पाटील याला घासून गेली. अजितने संतोषला शिवीगाळ केली. संतोष हा दुचाकी घेवून पाठीमागे आला. त्यावेळी त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली.
दरम्यान, रस्त्यावरून पोलिस निघाले होते. त्यांनी हटकले असता दोघेही घटना स्थळावरून निघून गेले. वादाचा राग मनात धरून अजित पाटील याने संतोष कदम याचा काटा काढायचा असे मनात ठरवले. अजितने सुरज उर्फ पांड्या जाधव, प्रतिक उर्फ पिल्या पाटील यांच्यासह तीन अनोळखी मित्रांना बोलावून घेतले. रात्री १२:३० च्या सुमारास हे सहाजण दुचाकी घेवून निनाईनगर येथील संतोष कदम याच्या घराजवळ गेले. परिसरातील चौकात उभे राहून मोबाईल वर संपर्क करून संतोष कदमला बोलावून घेतले. चौकात पुन्हा वादावादी झाली. सर्वांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.पाचजणांनी संतोषला धरून ठेवले. अजित पाटील याने कमरेला लावलेला चाकू हातामध्ये घेतला आणि संतोष कदमच्या अंगावर सपासप वार केले.
संतोषच्या छाती,पोटावर व मांडीवर गंभीर वार केले. जिवाच्या आकांताने तो पळू लागला. जखमी अवस्थेतही संतोष कदम जीव वाचविण्यासाठी चौकातून जवळच असणाऱ्या चुलते शरद कदम यांच्या घरात शिरला. परंतू संतोषच्या छातीत झालेला वार हृदयापर्यंत पोहचल्याने अतिरक्त स्त्राव झाला. वार करून हल्लेखोर पळून गेले. संतोष वर गंभीर हल्ला झाल्याने नातेवाईकांनी त्याला खासगी दवाखान्यात नेले. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
मृत संतोष कदम याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे इस्लामपूर पोलिसात नोंद आहेत. तर हल्लेखोर अजित पाटील, प्रतिक पाटील व सुरज जाधव हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. ते तडीपार होते. पण पुणे विभागीय आयुक्तांनी चांगल्या वर्तवणुकीच्या हमीवर तडीपारी स्थगीत करण्यात आली होती. दरम्यान त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आपल्या जुना सहकारी असणाऱ्या संतोष याला संपवले.
या घटनेची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळताच पो.नि नारायण देशमुख पोलिस पथकासह घटनास्थळी पोहचले. तेव्हा घटनास्थळी रक्ताचा थारोळा साचला होता. पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. रात्री उशीरापासून आरोपींना जेरबंद करण्यासाठी गतीने सुत्रे हलवण्यात आली. स.पो.नि. गणेशप्रसाद भरते, पो.ना.शरद जाधव यांनी पंचनामा केला. घटनास्थळी मृत संतोष कदम याच्या चपला व हल्लेखोरांनी वापरलेल्या चाकूचे कव्हर पोलिसांनी जप्त केले.