‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार

महापौरांची पत्रकार परिषदेत घोषणा; तुषार कामठेंच्या लढाईला पहिले यश

पिंपरी (प्रतिनिधी) – बँक खात्यावर लाचेची रक्कम स्विकारणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्यांना दोन दिवसांमध्ये सक्तीच्या रजेवर पाठविले जाईल, चौकशी समिती नियुक्त करून दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल, अशी घोषणा महापौर माई ढोरे यांनी आज (सोमवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

तुषार कामठे यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचारा विरोधातील लढाईत उशीरा का होईना भाजपाचे पदाधिकारी अखेर सहभागी झाले असून त्यांनी कारवाईची घोषणा केल्यामुळे कामठे यांच्या लढाईला पहिले यश आल्याचे मानले जात आहे. या पत्रकार परिषदेला उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे उपस्थित होते.

वैद्यकीय विभागासाठी साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना बँक खात्यावर लाखो रुपयांची रक्कम दिली होती. विशेष म्हणजे ही रक्कम संबंधित ठेकेदाराने आपल्या आयकर विवरणपत्रातही दाखविली होती. अनियिमित निविदा प्रक्रियेची माहिती घेताना तुषार कामठे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी ४ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रकरणी आवाज उठविला होता. तसेच पुरावे सादर केले होते. यानंतर आयुक्तांनी १५ दिवसांत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती.

मात्र २५ दिवसानंतरही आयुक्तांनी कोणतीही कारवाई न करत या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न चालविला होता. यामुळे नगरसेवक तुषार कामठे यांनी पत्रकार परिषद घेत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. तर कालच (रविवारी) फेसबुक लाईव्हद्वारे भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारण्याची घोषणा केली होती. कामठे हे भाजपाचे नगरसेवक असून सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच त्यांनी आवाज उठविल्यामुळे भाजपाची चांगलीच गोची झाली होती.

कामठे हे भाजपाचे नगरसेवक असताना व महापालिकेत भाजपाची सत्ता असतानाही पदाधिकारी काहीच भूमिका धेत नसल्यामुळे भाजपाविरोधात शहरवासियांमध्ये संतापाची भावना रुजू लागली होती. ही गोष्ट लक्षात येताच महापालिकेतील चारही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या अधिकाऱ्यांवरील कारवाईची घोषणा केली.

यावेळी बोलताना महापौर माई ढोरे म्हणाल्या, भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाऱ्यांना कधीही पाठिशी घालणार नाही. आयुक्तांनी या प्रकरणी कारवाई करणे अपेक्षित असून चौकशी समिती नियुक्त करून तात्काळ कारवाई केली जाईल. चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत या सर्व अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले जाईल. तसेच कामठे यांनी खरेदी संदर्भात जी प्रकरणे उजेडात आणली आहेत, त्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नसल्याचेही महापौर यावेळी म्हणाल्या.

ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणार…

लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई करतानाच संबंधित ठेकेदाराचीही चौकशी केली जाईल. त्याने पुरविलेल्या संपूर्ण साहित्यासोबतच निविदा प्रक्रियेबाबतही चौकशी करून ठेकेदारावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. कायद्यातील तरतुदी पाहून आयुक्तांनी ही कारवाई करावी, असेही ढाके यावेळी म्हणाले.

निविदा प्रक्रियांची चौकशी होणार….

गेल्या दोन ते तीन वर्षांत ज्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत, त्या सर्व निविदांबाबत चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना दिले जाणार आहेत. कोणत्याही ठेकेदाराला पाठीशी घातले जाणार नसून संपूर्ण चौकशी पारदर्शी पद्धतीने होईल, अशी माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

भ्रष्टाचार खपवून घेणार नाही – कामठे

अधिकाऱ्यांनी घेतलेली लाच हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी अभिनंदन करतो. यामुळे माझ्या पक्षाची प्रतिमा उजळूनच निघाली आहे. मात्र आयुक्त जोपर्यंत कारवाई करणार नाहीत, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. या अधिकाऱ्यांना महापालिकेतून बडतर्फ करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, ज्या ठेकेदारांशी संगणमत करून त्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकावे तसेच अनागोंदी असणाऱ्या निविदा प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईपर्यंत आपण या प्रकरणी लढा देतच राहू अशी प्रतिक्रिया नगरसेवक तुषार कामठे यांनी ‘प्रभात’शी बोलताना दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.