शंभर वारकऱ्यांना तरी चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिनेसाठी परवानगी द्या

पुणे जिल्हा वारकरी सेवा संघ यांची  मुंबई उच्च न्यायालयात याचिका…

विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच लाख नव्हे तर मोजक्या पाच पंचवीस वारकऱ्यांना पायी वारी करण्याची परवानगी द्यावी ही मागणी देखील सरकारने नाकारली व वारी सोहळा यंदा रद्द झाला मात्र आता आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर १०० वारकऱ्यांना चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिनेसाठी परवानगी द्यावी, या मागणीसाठी सरकारचे नव्हे तर उच्च न्यायालयाचा दरवाजा वारकऱ्यांनी ठोठावला आहे.

पुणे वारकरी सेवा संघाने याबाबतची याचिका मुबई हायकोर्ट मध्ये सोमवारी दाखल केली असून आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या सुनावणी कडे लागले आहे. विशेष बाब म्हणजे जगन्नाथ रथयात्रेला मिळालेल्या परवानगीचा संदर्भ या याचिकेत देण्यात आला आहे.

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला सोहळा यंदा खंडित झाल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड हुरहूर लागून आहे.सर्व खबरदारी घेत किमान १०० लोकांना वारीची परवानगी द्या,परंपरेतील निष्ठेचा विचार करा अशी आग्रही मागणी जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांच्या बैठकीत वारकरी प्रतिनिधींनी व परंपरागत चोपदार राजाभाऊ व श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती सदस्य माधवीताई निगडे यांनी केली होती. शेवटी तर ही संख्या पाच -पंचवीस करा पण नेम मोडू नका अशी विनंती केली गेली पण काहीही सकारात्मक निर्णय झाला नाही.यामुळे वारकरी खूप नाराज झाले.आम्ही दाखवलेल्या सामंजस्य व सहकार्याच्या भूमिकेचा अति गैरफायदा घेतला की काय अशी पण भावना वारकरी व्यक्त करीत आहेत.

त्यातच पंढरपूर च्या सर्व दिशा रस्ते कडेकोट बंद करण्यात आले. हे होत असताना तिकडे जगन्नाथ रथयात्रेस मात्र परवानगी मिळते,राज्यात सर्व व्यवहार,लग्न समारंभ हॉटेल व्यवसाय सर्व काही जोरात सुरू आहे.पुणे मुबंई च नव्हे तर सर्वत्र गर्दी ओसंडून वाहत आहे मग फक्त वारीवरच निर्बंध लावले व वारकरी परंपरा इतकी कौतुकास्पद की वारकऱ्यांनी सरकारला सहकार्य केले मात्र आता किमान वाखरी ते पंढरपूर दरम्यान एक दिंडी व चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा यासाठी परवानगी मिळणेबाबत वारकरी आग्रही आहेत.व याच मागणीसाठी वारकरी सेवा संघाच्या पुणे जिल्हा च्या वतीने थेट याचिकाच दाखल करण्यात आली असल्याचे वारकरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर कामठे यांनी सांगितले.

निष्ठेचा आदर व्हावा….

वारी सोहळा हे राज्याच्या भक्ती व सांस्कृतिक परंपरेचे वैभव आहे.पण वारकरी परंपरा आक्रस्ताळी नाही म्हणून तर सरकारचा निर्णय योग्य असो की अयोग्य तो वारकर्यांनी पाळला आहे.पण दहा लाखापेक्षा जर १०० वारकऱ्यांना किमान वाखरी ते पंढरपूर सोहळा व पंढपुर दिंडीस तसेच चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिनेसाठी परवानगी द्यावि. इतके झाले तरी आपले प्रतिनिधी म्हणजेच आपण किमान अखेरच्या टप्प्यात तरी वारी केली याचे समाधान प्रत्येक वारकऱ्यांला लाभेल असे राजाभाऊ चोपदार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.