पुणे -फुटपाथवर झोपण्यास विरोध करून शिवीगाळ केली. या रागातून युवकाने भिक्षेकऱ्याचा डोक्यात सिमेंटचा कॉंक्रीटचा ब्लॉक घालून खून केला. ही घटना 3 मे रोजी मध्यरात्री पद्मजी चौकाजवळ फुटपाथवर घडली. दरम्यान, भिक्षेकऱ्याची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याचे वय अंदाजे 65 असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी समर्थ पोलिसांनी मोहित अमिर अंगिर (वय 30, रा. खडकी) याला अटक केली आहे. याबाबत रिजवान शेख (वय 41,रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी मोहीत हा उच्चशिक्षित आहे. त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला असून तो एकटाच राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो या परिसरात येत होता.
दि. 3 मे रोजी मध्यरात्री फुटपाथवर झोपण्याच्या कारणातून त्याचे भिक्षेकऱ्याशी वाद झाले. त्यातून त्याने वृद्धाचा खून केला.
हा प्रकार सुरू असताना फिर्यादी शेख यांनी पाहिले होते. तसेच इतर नागरिकांनी देखील याची माहिती पोलिसांना दिली. मोहित हा पळण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात पोलिसांना त्याला पकडले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत.