पिंपरी -पुनावळे ते मुकाई चौक बीआरटी रस्त्याशेजारी शेतकऱ्यांच्या जागेवर बांधकाम करून अनेकांनी आपल्या रोजी रोटीची व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांच्या जागेवर असलेल्या या दुकानांना अनधिकृत ठरवित महापालिकेने या दुकानांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पहिल्यांदा बीआरटी रस्त्याचा नव्याने डीपीआर तयार करून शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला द्यावा आणि त्यानंतरच या दुकानांवर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी केली आहे. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भोंडवे यांनी दिला आहे.
शहरातील विविध रस्त्यांच्या शेजारी अतिक्रमण करून केलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (दि. 4) शहरात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईला भोंडवे यांनी विरोध केला असून पुनावळे ते मुकाई चौक बीआरटी रस्त्यावरील बांधकामांवर कारवाई करू नये अशी मागणी केली आहे. याबाबत माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुनावळे ते मुकाई चौक बीआरटी रस्त्याच्या डीपीआर हा 30 मीटर रस्त्याचा आहे. 30 मीटर डीपीआरच्या आरक्षित जागेवर एकही अतिक्रमण नाही.
बीआरटी रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागेवर ही दुकाने आहेत. ही दुकाने अधिकृत परवानगी घेऊन बांधली नसली तरी स्वत:च्या मालकीच्या जागेत ही दुकाने सुरू करण्यात आली आहेत. या दुकानांमुळे अनेकांची रोजीरोटी सुरू आहे. महापालिकेच्या एका फुटाच्या जागेवरही अतिक्रमण नाही. त्यामुळे या बांधकामावर कारवाई करू नये. ही बांधकामे हटवायची असल्यास 30 मीटर ऐवजी 45 मीटरचा डीपीआर तयार करावा. त्यावर आरक्षण टाकावे.
महापालिकेने शेतकऱ्यांची जागा ताब्यात घ्यावी. त्याचा मोबादला शेतकऱ्यांना द्यावा व ही जागा ताब्यात घ्यावी, त्यानंतर आम्ही स्वतःहून बांधकामे हटविण्यास तयार आहोत. परंतू, बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने कारवाई होऊ देणार नाही, असा इशाराच माजी नगरसेवक भोंडवे यांनी दिला आहे.
प्रशासन चुकीचे धोरण राबवत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये नव्याने डीपीआर होईपर्यंत एकही दुकान हटवू देणार नाही. स्थानिक आणि येथील व्यावसायिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. महापालिकेने चुकीची कारवाई करून गोर-गरिबांची रोजी-रोटी हिरावून घेऊ नये. त्यानंतरही कारवाई केल्यास प्रशासनाला तीव्र परिणांमाना सामोरे जावे लागेल.
– मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक