पिंपरी – घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा गळा आवळून अत्यंत निर्घुणपणे खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली.
कमल बाबूराव खाणेकर (वय 55, रा. हरगुडेवस्ती, चिखली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल यांचा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांना घराबाहेरून आवाज दिला. मात्र त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने उघड्या दरवाजावाटे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने घरात प्रवेश केला.
त्यावेळी कमल यांचे हातपाय बांधलेले आणि तोंडाला चिकटपट्टी लावलेली आढळून आली. त्यांनी या घटनेची माहिती त्वरीत चिखली पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी कमल यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शवविच्छेदन अहवालात कमल यांचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न स्पष्ट झाले आहे. त्यांचा खून कोणी आणि कशासाठी केला आहे, याचा चिखली पोलीस तपास करीत आहेत.
पतीसोबत मतभेद असल्यामुळे कमल एकट्याच रहात होत्या. त्यांनी स्वत:च्या काही खोल्या आणि दुकाने भाड्याने दिली आहेत. त्यातून त्यांना दरमहा 40 ते 50 हजार रुपये भाडे मिळत होते. त्यांच्याकडे दोन मोटारीही होत्या. त्या स्वतः मोटारी चालवत असत. भटक्या कुत्र्यांना त्या चिकण खाऊ घालत होत्या.
बुधवारी देखील त्यांनी घरात दोन ते तीन किलो चिकन आणल्याचे घरात आढळून आले. त्यांचा खून मालमत्तेच्या कारणावरून की इतर कारणावरून झाला त्याबाबत मात्र निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.