पुणे – वाल्हेकरवाडी मठाधिपती असलेल्या महाराजाने अनैतिक संबंधातून एकाचा खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह कात्रज घाटात टाकून अपघाताचा बनाव केला. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करत महाराजाचा कट उघडकीस आणून महाराजासह चौघांना अटक केली.
याप्रकरणी महाराज रमेश कुंभार आणी मठात काम करणारे निलेश निकम, अशोक बडगाम आणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. आनंद गुजर (44, रा. आकुर्डी) असे मृताचे नाव आहे. पोलिसांना सकाळी नागरिकांनी फोन करून कात्रज नव्या घाटातील हॉटेल मराठी शाही समोर बेवारस मृतदेह पडल्याची खबर दिली. मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.
दरम्यान मृतदेहाजवळ एक दुचाकी सापडली. तीचा नंबर तपासला असता, तो बनावट आढळला. यानंतर पोलिसांनी चॅसी नंबरवरुन गाडी मालकाचा शोध लावला. ही गाडी आनंद गुजर याची असल्याचे उघड झाले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला.
गुजर हा शुक्रवारी सायंकाळी मठामध्ये गेला. तेथे महाराजांबरोबर भांडण झाली. या भांडणात महाराज आणि साथिदारांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आनंद यांचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ब्रीझा गाडीमध्ये टाकण्यात आला. तर तो आलेल्या ज्युपिटर स्कुटरचा नंबर बदलून तीही ब्रीझा पाठोपाठ एक भक्त घेऊन आला. त्यांनी आंनदचा मृतदेह कात्रज नव्या घाटातील मराठेशाही हॉटेलसमोर टाकला. त्याच्या शेजारीच स्कुटर ठेवण्यात आली.
आनंद गुजर सध्या कोणताही कामधंदा करत नव्हता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर काही तासातच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर व तपास पथकाचे नितीन शिंदे यांनी केली.