चेन्नई – श्रीलंकेचा विख्यात क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याने त्याच्यावरील बायोपिकसाठी हिरोच्या रोलसाठी निवडण्यात आलेल्या अभिनेत्याला या सिनेमातून बाहेर काढले. आश्चर्य म्हणजे या कलाकारानेही मुरलीधरनच्या विनंतीला मान देऊन या सिनेमातून बाहेर होत असल्याबद्दल जाहीर केले. त्याने मुरलीधरनला धन्यवाददेखील दिले आहेत.
मुरलीधरनच्या जीवनावर आधारलेल्या “800′ या बायोपिकसठी विजय सेतुपती या कलाकाराला मुरलीधरनच्या रोलसाठी निवडण्यात आले होते. मात्र त्याच्या निवडीवरून खूप टीका व्हायला लागली होती. मुरलीधरनने 2009 मध्ये यादवी युद्धाच्या काळात श्रीलंकेचे तत्कालिन अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना पाठिंबा देऊन तमिळ नागरिकांचा विश्वासघात केला, असा आक्षेप घेण्यात येत होता.
यावरून सोशल मिडीयातही वाद रंगला होता. एमडीएमके, पीएमके आणि ज्येष्ठ तमिळ चित्रपट निर्माते भारथिराजा अशा अनेकांनी विजय सेतुपतीला मुुरलीधरनच्या बायोपिकपासून दूर जाण्याची विनंती केली होती. या विरोधाची दखल घेऊनच मुरलीधरनने विजय सेतुपतीला हा सिनेमा सोडण्याबाबत सांगितले होते. त्याबरोबर आपण कधीही निरपराध नागरिकांच्या हत्येचे समर्थन केले नाही, असे स्पष्टिकरणही मुरलीधरनने दिले.
विजय सेतुपती सारख्या चांगल्या कलाकाराला आपल्यामुळे त्रास व्हावा, असे आपल्याला वाटत नाही. अनावश्यक वादामुळे त्याच्या भविष्यातील करिअरपुढे अडथळे उभे राहू नयेत, म्हणून त्याला हा सिनेमा सोडण्यास सांगितले होते, असे मुरलीधरनने सांगितले. त्यावर विजय सेतुपतीने मुरलीच्या ट्विट हॅन्डलला टॅग करून “धन्यवाद’ म्हटले.
मात्र विजय सेतुपतीने हा सिनेमा सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे तामीळनाडूतील सत्तारुढ अद्रमुकने म्हटले आहे. आता मुरलीधरनच्या बायोपिकसाठी नवीन कलाकार निवडला जाणार आहे.