बीड – भ्रष्टाचाराच्या प्रकारणात मागील 2 वर्षांपासून गाजत असलेल्या वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन अशोक जैन यांना तब्बल दहा लाखांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ सहकारी बॅंकही भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे.
परळी येथील अशोक जैन यांच्या राहत्या घरी आज औरंगाबाद लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकल्यानंतर हा प्रकार समोर आला. वैद्यनाथ बॅंकेने कळंब येथील बॅंकेच्या एका सभासदाला अंदाजे अडीच कोटी रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर केले असल्याचे समजते. त्या प्रकरणी चेअरमन अशोक जैन याने 15 लाख रुपयांची लाच मागितली होती.
त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर आज 15 लाखांच्या रकमेपैकी 10 लाख रुपये दुपारी 2 च्या सुमारास चेअरमन अशोक जैन यांच्या निवासस्थानी देण्याचे ठरले होते.
ठरलेल्या वेळेनुसार, तक्रारदार 10 लाखांची रक्कम घेऊन अशोक जैन यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. यावेळी 10 लाखांची लाच घेत असताना अशोक जैन यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.