पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील कर्करोगाच्या रुग्णांची वाढ लक्षात घेता, महापालिकेने नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात पेट स्कॅन सुविधा सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यासाठी जागा निश्चित होणे बाकी आहे. ही जागा शहराच्या मध्यवर्ती भागात असेल असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. मनपाने आरोग्य विभागासाठी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात २०२३-२४ च्या तुलनेत केवळ नाममात्र वाढ केली आहे. यावर्षी ही तरतूद ५१६ कोटी रुपये आहे.
निदान सुधारण्यासाठी आम्ही शहरात आणखी दोन कॅथ लॅब सुरू करत आहोत. एकूण ३१ जेनेरिक औषधांची दुकाने असतील. नागरिकांना परवडणारी औषधे खरेदी करता यावीत, यासाठी येत्या वर्षभरात त्याची सुरुवात करू, असे विक्रम कुमार यांनी सांगितले. महापालिकेच्या आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या सुधारणांची गरज असताना, आरोग्य विभागासाठी नागरी संस्थेची तरतूद २०२३-२४ च्या अर्थसंकल्पांतर्गत आरोग्य विभागासाठी ५०५ कोटींची तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ११ कोटी रुपयांनी वाढली आहे.
स्व. भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या ५०० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेत होणार आहे. तेथील नायडू रुग्णालय हलवण्यात आले आहे. याचवर्षी हे काम पूर्ण होईल. याच जागेत स्टाफ क्वार्टर आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधली जातील. जेणेकरुन विद्यार्थी आणि प्राध्यापक नवीन रुग्णालय चालवू शकतील आणि नागरिकांनाही त्याच ठिकाणी सर्वोत्तम सुविधा मिळू शकतील, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.