‘ओडीएफ प्लस प्लस’मध्ये महापालिका पास

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील सहभाग कायम; जानेवारीत झाले होते सर्वेक्षण

पुणे -“स्वच्छ सर्वेक्षण 2020’च्या स्पर्धेत शहराचे स्टार रेटिंग जाहीर करण्यासाठी पालिकेस शहर हागणदारी मुक्‍त (ओडीएफ प्लस) असल्याचा दर्जा मिळविणे बंधनकारक होते. मात्र, या स्पर्धेत नापास झाल्याने हे रेटिंग मिळाले नव्हते. त्यामुळे या स्पर्धेतून महापालिका बाहेर पडण्याची शक्‍यता असतानाच “ओडीएफ प्लस प्लस’चा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या स्पर्धेतील महापालिकेचा सहभाग कायम आहे.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील शहरांच्या स्वच्छतेचे रॅकिंग ठरविण्यात येते. यात पहिले तीन वर्षे पहिल्या दहा शहरांमध्ये असलेल्या पुण्याचे 8 मानांकन 2019 मध्ये थेट 37 वर गेले होते. त्यामुळे महापालिकेने 2020 साठी कंबर कसत जानेवारीपासूनच जय्यत तयारी केली होती. मात्र, स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास शहराचे स्टार रेटिंग आवश्‍यक आहे. यासाठी शहर हागणदारी मुक्‍त बंधनकारक असून त्यातही ओडीएफ प्लस, ओडीएफ प्लस प्लस असा दर्जा असणे आवश्‍यक आहे. त्यांतर्गत पालिकेने यावर्षी ओडीएफ प्लस दर्जासाठी केंद्राकडे अर्ज केला होता. त्यांतर्गत सुमारे 1,224 सर्वाधिक चांगल्या व अत्याधुनिक सुविधा असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांपैकी सुमारे 25 टक्‍के स्वच्छतागृहांची तपासणी केंद्राच्या पथकाकडून झाली होती. यात स्वच्छतागृहांत वेगवेगळे 53 निकष पूर्ण असणे आवश्‍यक होते.

मात्र, अनेक ठिकाणी हे निकष पूर्ण न झाल्याने या पथकाने पालिकेस ओडीएफ प्लस दर्जा दिला नाही. परिणामी, शहराचे स्टार रेटिंग करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे महापालिकेने पुन्हा केंद्र शासनाकडे हा दर्जा मिळविण्यासाठी अर्ज केला. मात्र, यावेळी ओडीएफ प्लसवर न थांबता पालिकेने थेट ओडीएफ प्लस प्लससाठी अर्ज केला. त्यासाठी प्रशासनाकडून 1,250 मधील 310 बेस्ट टॉयलेट उभारून या दर्जासाठी दिवसरात्र एक केला. याच्या तपासणीसाठी क्‍युसीआय या संस्थेने दोन दिवस गूपचूप 49 ठिकाणांची पाहणी केली होती.

महापालिकेसाठी ही अभिमानाची बाब आहे. या सर्वेक्षणासाठी तत्कालीन आयुक्‍त सौरभ राव यांच्यापासून ते क्षेत्रीय कार्यालयसह सर्वच विभागाने विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे ओडीएफ प्लस प्लसचा दर्जा मिळविता आला आहे. तसेच, हा दर्जा मिळाल्यामुळे स्वच्छ
सर्वेक्षण स्पर्धेतही पालिका अव्वल येईल असा विश्‍वास आहे.
– ज्ञानेश्‍वर मोळक, उपायुक्‍त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.