पुणे – शहरात करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्यावसायिक आस्थापना तसेच सार्वजनिक ठिकाणी केले जात नसल्याचे समोर आले आहे. या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याबाबत महापालिकेने नियोजन केले आहे.
शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आहे. अशा वेळी करोना रोखण्याच्या नियमांचे पालन केले जाते, की नाही याची तपासणीच महापालिकेकडून केली जात नसल्याची बाब दैनिक “प्रभात’ने “दुसऱ्या लाटेला पालिकेचेच निमंत्रण’ या वृत्ताद्वारे सोमवारी उजेडात आणली होती. त्याची गंभीर दखल घेत मंगळवारी ही पथके नेमण्यात आली आहेत.
शहरात मॉल, हॉटेल्स तसेच व्यावसायिकांकडून करोना रोखण्याबाबतचे नियम पाळले जात आहेत, की नाही याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर चार जणांचे पथक नेमण्यात आले आहे. यात महापालिका आणि स्थानिक पोलिसांच्या प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
शहरात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडयापासून करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा कमी होण्यास सुरूवात झाली होती. मात्र,त्यानंतर दिवाळीतील गर्दीचे परिणाम दिसायला सुरूवात झाली आहे. यामुळे नवीन रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, त्याच वेळी अनलॉक प्रक्रिया सुरू करताना महापालिकेने मॉल, हॉटेल दुकाने, व्यावसायिक आस्थापनांना करोना प्रतिबंधाचे नियम घालून दिले आहेत. त्यानुसार मास्क वापरणे, ठराविक वेळेनंतर संबंधित ठिकाणी सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्स पाळणे, ग्राहकांचे थर्मल तपासणी, नोंद ठेवणे असे नियम घालून दिले आहेत.
मात्र, हे नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, या नियमांची तपासणी करण्यासाठी तसेच नियमांचे पालन केले जात नसल्यास संबधितांवर कडक कारवाई करण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर 15 पथके नेमण्यात आली आहेत. त्याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले आहेत.