औंध (अभिराज भडकवाड) –महापालिका निवडणुकीचे प्रभाग जाहीर झाल्यानंतर आता आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातही आरक्षणाचा अंदाज बांधत अनेक प्रभागात महिला उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे हळदी-कुंकू कार्यक्रमांवर मोठा ठर दिला जात आहे.
राजकीय पक्षांनीही मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतचा मुहूर्त साधत निवडणुकीसाठी इच्छुक महिला उमेदवारांना अपेक्षित प्रभागात हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे औंध, बाणेर, पाषाण, सूस, महाळुंगे यासह अन्य भागातही अशा कार्यक्रमाची रेलचेल मोठी दिसली. 500 ते 1000 रुपयांच्या साड्यांपासून ते अगदी 20 किंवा 30 रुपयांचे वाण देत इच्छुक महिला उमेदवारांनी प्रत्येक मतांला “कुंकू’ लावून ठेवले.
राजकीय पक्षांचे हळदी-कुंकू कार्यक्रम दरवर्षीच आयोजित केले जातात. यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला उमेदवारांसाठी हा “इव्हेंट’ जोरदार घेण्यात आला. मतदान “आरक्षीत’ करून ठेवण्याची संधी आजी-माजी सह इच्छुक उमेदवारांनीही साधली. सोमवारी (दि.7) रथसप्तमीला हळदी-कुंकू कार्यक्रम संपले असले तरी या कार्यक्रमांतून महिला मतदारांना खूष करून त्यांचे मत आपल्यालाच पडणार, असा विश्वास आजी-माजीसह इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला आहे. परंतु, असे कार्यक्रम सर्वच राजकीय पक्षांनी तसेच सर्वत्र घेतले गेल्याने महिला उमेदवारांचे नेमके मत कोणाला जाणार? याबाबत शंका आहे.
5 ते 10 लाखांचा खर्च…
प्रभाग रचना बदलल्याने नव्या भागाचा विचार करता हळदी-कुंकू कार्यक्रमांसाठी जवळपास 5 ते 10 लाखांचा खर्च होत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे. साधारण 50 ते 100 रुपयांची वस्तू आणि प्रभागातील चार ते पाच हजार महिलांचा सहभागी झाल्या तरी चार ते पाच लाख खर्च येतो. मोठा कार्यक्रम झाला तर हा खर्च 10 लाखांपर्यंतही जात असल्याचे उघड आहे.
नव्या भागात “वाण’ वाटप…
हळदी-कुंकूवाचे कार्यक्रम निवडणुकीसाठी इच्छुक पुरूष उमेदवारांनीही आपल्या सौभाग्यवती, मातोश्री यांच्यावर जबाबदारी टाकल्याचे दिसून आले. महिला मतदारांना मतांसाठी विनवणी करण्यासाठी ही “आयडीया’ सर्वच ठिकाणी आमलात आणली गेली. करोनामुळे हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करताना काळजी घेतली गेली. राजकीय पक्षांनी वस्त्या, वसाहतींमध्ये, चाळींमध्ये छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रभागरचना बदलल्यामुळे आपल्या प्रभागात कोणता भाग आहे, याची माहिती घेत तसेच आरक्षणाचा अंदाज बांधत हळदी-कुंकू कार्यक्रम घेतले गेले. विशेष म्हणजे अशा कार्यक्रमासाठी “वाण’ वाटपावेळी सर्व धर्माच्या महिलांना निमंत्रण दिले गेले. जो प्रभाग महिलांसाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी नगरसेवकांनी आपल्या मातोश्री, पत्नी, वहिनी यांच्यासाठी अशा कार्यक्रमातून निवडणुकीची तयारी सुरू केली.