तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगरपरिषद मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी अॅक्शन मोडवर असून शंभर टक्के वसुलीसाठी ४४ कर्मचाऱयांचा समावेश असलेली दोन पथके नेमून कडक वसुली मोहीम राबविण्याचे आदेश मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिले आहेत. नगरपरिषदेच्या हद्दीतील मालमत्ता धारकांकडून सध्या घरपट्टी, पाणीपट्टी, इतर वसुलीसाठी करसंकलन विभाग कार्यरत आहे.
मात्र, गेल्या ११ महिन्यांत मालमत्ताधारकांकडून अवघी ३९ टक्के वसुली झाल्याने मुख्याधिकारी पाटील यांनी सर्व करसंकलन विभागाची विशेष आढावा बैठक घेऊन वसुलीसाठी कठोर उपाययोजना करण्याची घोषणा केली. विशेष वसुली अभियान राबविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचा समवेश असलेली दोन पथके नेमून त्यांना दोन सत्रात घरोघरी जाऊन वसुली करा असा आदेश दिला आहे.
पहिल्या पथकाचे प्रमुख म्हणून उपमुख्याधिकारी ममता राठोड व सहायक पथक प्रमुख विजय शहाणे यांची नियुक्ती केली आहे. तर, या पथकात राज्य सवंर्ग अधिकारी वीरेंद्र नारगुंडे, नरेंद्र कणसे, जयंत मदने, सुवर्णा काळे, मल्लिकार्जून बनसोडे, प्रमोद फुले, गीतांजली होनमाना, नगरपरिषद कर्मचारी यांच्यासह २२ जणांची नेमणूक केली आहे.
दुसऱया पथकाच्या प्रमुख करसंकलन विभागाच्या प्रमुख कल्याणी लाडे व सहायक म्हणून भांडारकर प्रमुख सिद्धेश्वर महाजन तसेच गणेश कोकाटे, कैलास कसाब, सोनाली सासवडे, अभिषेक शिंदे, मयुर मिसाळ, तुकाराम मोरमारे, मनिषा चव्हाण, भास्कर वाघमारे आदी २२ जणांचा समावेश आहे. या पथकांना घरोघरी ढोल पथक घेऊन जाऊन वसुली करावयाची आहे. पहिले पथक सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत वसुली करेल.
तर दुसरे पथक दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यत वसुलीचे कम करेल. दोन्ही पथक प्रमुखांनी दैनंदिन वसुली अहवाल मुख्याधिकारी पाटील यांना सादर करावयाचा आहे. वसुलीच्या कामात टाळाटाळ, दिरंगाई केल्यास शिस्तभंगाची कार्यवाही करणार असल्याचे लेखी आदेशानुसार कळविले आहे.
उदासिन मालमत्ताधारक…
उदासिन मालमत्ताधारकामुळे नगरपरिषदेची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी विकास कामासाठीचा निधीही रखडला आहे. वसुली कमी होत असलेल्याने शासनाचे अनुदान कमी मिळत आहे. म्हणून मुख्याधिकारी एन. के. पाटील वसुली बाबत अॅक्शन मोडवर असल्याचे समजते.