तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवस्थानाच्या विविध विकास कामासाठी महाराष्ट्र शासन पुरातत्त्व विभागाकडून ३५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील पहिल्या टप्प्याचे ११० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जेजुरी देवस्थानचे नवनिर्वाचित मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे यांनी दिली.
तळेगाव दाभाडे येथे नगरसेवक संतोष दाभाडे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी अनिल सौंदडे बोलत यांनी माहिती दिली. या वेळी माजी नगराध्यक्ष ऍड. रवींद्र दाभाडे, पश्चिम महाराष्ट्राचे विश्व हिंदू परिषदेचे धर्मप्रसारक राजाभाऊ चौधरी, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष अशोक दाभाडे, शहर सहकार आघाडी प्रमुख रणजीत पिंगळे, आनंद दाभाडे, विक्रम दाभाडे, उद्योजक प्रशांत शहा, व्याख्याते ऍड. विनय दाभाडे आदी उपस्थित होते.
अनिल सौंदडे म्हणाले की, पुरातत्त्व विभागाकडून जेजुरी गडाच्या व परिसराच्या विकासासाठी ३५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात गडाचे जतन, संवर्धन, दुरुस्ती, मूळ मंदिर गाभारा, गडकोट व पायरी मार्गाचे काम तसेच होळकर तलाव, पेशवे तलाव दुरुस्ती, परिसरातील मंदिराचा जीर्णोद्वार आदी कामांबरोबर भाविकांसाठी भक्तनिवास सुविधा पूर्ण करायच्या आहेत. २०२५ पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील.