तळेगाव दाभाडे, {मनोहर दाभाडे} – उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे अंगाची काहिली होत आहे. अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. अशावेळी शरीराला शीतलता देणाऱ्या पेयांवर भर दिला जातो. बाजारात अनेक शीतपेये मिळत असली, तरी शरीराला शीतलता देणाऱ्या पेयांमध्ये सहज मिळणारे म्हणजे स्वयंपाकघरातले ताक.
आयुर्वेदात ताकाला अमृत म्हटले आहे. ताक शरीराला थंडावा देत असल्याने उन्हाळ्यात दाह कमी करण्यासाठी ते उपयुक्त असते. लो कॅलरी असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ते फायदेशीर आहे. पण त्यासाठी ताक ताजे असायला हवे.
ताक हे घरोघरी सहज उपलब्ध असते. शिवाय ते तयारही करतात. कालवणाचा विषय, तेव्हा ताक-भातही चालतो. ताक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ताक हे प्रोबायोटिक आहे. ताकात बी-१२ व्हिटॅमिन असते. दह्यामुळे काहींना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
मात्र, ताकाने तसे होत नाही. काही पोटाचे आजार असणाऱ्यांनी जेवणाऐवजी नुसते ताक पिले, तरी त्यांना समाधान मिळते. कारण ताकाचे जिवाणू प्रोबायोटिक असतात आणि ते आपणाला तंदुरुस्त ठेवतात.
कॅलरीबाबत जागरूक असणारे, वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांनी ताक पिणे फायदेशीर असते. काही जण ताकाने अॅसिडिटी होते असे म्हणतात. परंतु, असे व्हायला नको. असा त्रास होऊ नये, यासाठी शिळे म्हणजे आंबट ताक पिऊ नये. लोणी न काढलेले ताक खूप चांगले. लाकडी रवीने घुसळलेले ताक स्वादिष्ट असते. ताकात मीठ किंवा शिंदीलोण टाकून पिल्यास पोटाचे विकार दूर होतात.
विरजण कसे लावायचे ?
तुपासाठी सायीसकट विरजण लावतात. केवळ ताकासाठी विरजण लावायचे असल्यास साय काढून कोमट दूध वापरतात. अशा विरजणासाठी ताजे, गोड दही वापरावे. विरजणासाठी मातीचे पसरट तोंडाचे पात्र सर्वोत्तम. मातीचे पात्र नसल्यास चिनी मातीचे किंवा काचेचे भांडे वापरता येते.
■ दही घेतल्यावर नंतर थोडे थोडे पाणी मिसळून घुसळावे.
■ ताक सकाळी फ्रीजमध्ये ठेवल्यास सायंकाळी पिता येते.
■ ताक हा बाजारात मिळणाऱ्या कोल्ड्रिंकऐवजी चांगला पर्याय.
■ आजारी माणसे, यांना पर्याय म्हणून ताकापासून पेज करून देता येते.
■ ताकामध्ये मीठ, साखर, जिरेपूड, पुदीना काहीही टाकले तरी ते चांगलेच लागते.