पिंपरी, दि. 7 – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या दिव्यांग, कर्णबधीर आणि शंभर टक्के अंध नागरिकांना पीएमपीने मोफत प्रवास करण्यासाठी विनाशूल्क प्रवासी पास देण्यात येतो. चालू आर्थिक वर्षात शहरातील तब्बल दोन हजार 565 दिव्यांगांनी या मोफत बस प्रवास योजनेचा लाभ घेतला. त्याच्या खर्चापोटी महापालिकेमार्फत पीएमपीला चार कोटी 22 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या नगरवस्ती विकास योजना विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. 10 मे 2022 रोजीच्या निर्णयानुसार, अंध, निःसमर्थ, कर्णबधीर, मतिमंद व्यक्तींना पीएमपीचा मोफत प्रवासी पास आणि महापालिका हद्दीतील 60 वर्षांपुढील अंध व्यक्तींसोबतच्या व्यक्तीस बस पास देण्यात येतो. त्यानुषंगाने चालू आर्थिक वर्षात म्हणजेच सन 2022-23 मध्ये मोफत प्रवासी पास वाटप करण्यासाठी दिव्यांग बांधवांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तब्बल दोन हजार 561 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.
मोफत प्रवासी पाससाठी खर्च झालेली चार कोटी 22 लाख 91 हजार रुपये मिळण्याबाबत पीएमपीने महापालिकेला विनंती केली आहे. बिलाची रक्कम चार कोटी 22 लाख 23 हजार आहे. तर, 60 वर्षांपुढील अंध व्यक्तींच्या सोबत असणाऱ्यास पास दिले जातात. त्यांच्या बिलाची रक्कम 67 हजार रुपये आहे. त्यानुसार एकूण चार कोटी 22 लाख 91 हजार रुपये ही रक्कम महापालिकेकडून पीएमपीएलला देण्यात येणार आहे.
दिव्यांग नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा
शहरातील दिव्यांग, कर्णबधीर व शंभर टक्के अंध नागरिकांना विनाशूल्क प्रवास करता यावा, यासाठी ही योजना राबविली जाते. परंतु, असे बहुतांश नागरिक या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. दिव्यांग, कर्णबधीर व शंभर टक्के अंध नागरिकांनी योग्य कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.