पिंपरी– पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन 2021-22 चे अंदाजपत्रक फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर केले जाणार आहे. या आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकाचे काम अंतिम टप्पात आले आहेत. करोना महामारी संसर्गामुळे यंदा सर्व विभागांनी ऑनलाइन माध्यमाचा वापर केल्याने कामकाजाचा भार व वेळ वाचणार आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्तांकडून स्थायी समितीकडे दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सादर केले जाते. त्या दृष्टीने पालिकेच्या लेखा विभागाने तयारी केली आहे. अंदाजपत्रकाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. अंदाजपत्रक सादर करण्याचा दिवस निश्चित झाल्यानंतर ठराविक प्रती छापून घेण्यात घेण्यात येणार आहेत.
करोना महामारी संकटाचा परिणाम यंदा अंदाजपत्रकावर दिसणार आहे. जीएसटी, मिळकतकर, बांधकाम परवाना, पाणीपट्टी आणि इतर शुल्कातून मिळणारे उत्पन्न मर्यादित स्वरुपात आहे. सर्व शुल्काचे दर कायम ठेऊन केवळ मिळकतकरात वाढ केली जाणार आहे. कोणताही फुगवटा न दाखविता प्रत्यक्षात मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारित अंदाजपत्रक तयार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. करोना संकटामुळे नव्या योजनाचा समावेश न करता अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यावर भर दिला गेला आहे.