हैदराबादविरुद्ध मुंबईचेच पारडे जड

चेन्नई  -कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा हातातून सुटलेला सामना खेचून आणलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध आज सनरायझर्स हैदराबादचा कस लागणार आहे.

मुळातच खडूस हा शब्द ज्या संघासाठी वापरला जातो तो मुंबईचा संघ कर्णधार रोहित शर्माच्या अफलातून निर्णयांमुळे पहिल्या सामन्यातील पराभवातून दुसरा सामना जिंकत यशाच्या मार्गावर आला. आता याच संघाशी डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबाद संघाला दोन हात करायचे आहेत.

अर्थात, याही सामन्यात मुंबईचेच पारडे जड राहणार यात शंका नाही. कोलकाताने मुंबईला अवघ्या 152 धावावंर रोखले होते. तसेच कोलकाताच्या नितीश राणाने हल्ला चढवत मुंबईचा पराभव होणार हेच दाखवले होते.

मात्र, रोहितने गोलंदाजीत केलेले बदल व गोलंदाजांनीही केलेली अविश्‍वसनीय कामगिरी यांच्या जोरावर मुंबईने कोलकाताच्या तोंडचाच घास पळवला व विजय मिळवला. त्यांच्या संघात कर्णधार रोहितसह कॉन्टन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कॅरन पोलार्ड असे तगडे फलंदाज आहेत.

पोलार्ड, पंड्या यांना अद्याप सूर गवसलेला नसला तरीही ते असे खेळाडू आहेत की एक यशस्वी डाव त्यांना संपूर्ण स्पर्धेचा राज्यकर्ता बनवेल यात शंका नाही. त्यांची गोलंदाजीही या स्पर्धेत अन्य संघांच्या तुलनेत जास्त प्रभावी आहे. याचा दाखला कोलकाताविरुद्धच्या लढतीत दिसला.

राहुल चहरने अफलातून गोलंदाजी करत कोलकाताची फलंदाजी कापून काढली होती. त्याला समर्थ अनुभव असलेल्या जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट, कृणाल पंड्या व मार्को जेन्सन यांचीही तोलामोलाची साथ लाभली व हातातून निसटलेला सामना त्यांनी जिंकला. अशा जिद्दी संघाशी आज हैदराबादची लढत होत आहे. अर्थात संभाव्य विजेते मुंबईलाच मानले जात आहे. तरीही वॉर्नरचा संघ स्पर्धेत काही चमत्कारही घडवू शकतो.

हैदराबादच्या संघाबाबत बोलायचे झाले तर कर्णधार डेविड वॉर्नर याच्यावरच त्यांची फलंदाज अवलंबून राहणार आहे. संघात नावाजलेले फलंदाज असले तरीही त्यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याने हैदराबादला गेल्या स्पर्धेतही हातातोंडाशी आलेल्या विजयांनी हुलकावणी दिली आहे.

त्यांच्या संघात जेसन रॉय, मनीष पांडे, केन विल्यमसन, जॉनी बेअरस्टो, प्रियम गर्ग व केदार जाधव असा भक्कम फलंदाजांचा ताफा आहे. गोलंदाजीचे अवलोकन केले तर, सर्वोत्तम लेग स्पीन गोलंदाज रशिद खान याच्यासह भुवनेश्‍वर कुमार, यॉर्कर किंग टी. नटराजन, मिशेल मार्श व जेसन होल्डर अशी भेदक गोलंदाजांची फळीही आहे. आज जर मुंबईविरुद्धचा सामना त्यांना जिंकायचा असेल तर अत्यंत जबाबदारीने तसेच गांभीर्याने खेळ करावा लागेल.

सामन्याची वेळ
सायंकाळी : 7.30
ठिकाण ः एम. ए. चिदम्बरम स्टेडियम, चेन्नई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्‌सवर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.