मुंबई -भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी बीसीसीआय मध्यवर्ती वार्षिक केंद्रीय करारात अ प्लस श्रेणीतील स्थान कायम राखले आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा अश्रेणीत समावेश करण्यात आला आहे. तर, तडफदार फलंदाज पृथ्वी शॉ याला मात्र या करार पद्धतीतून वगळण्यात आले आहे.
एकूण 28 खेळाडूंना कराराच्या चार श्रेणींमध्ये स्थान देण्यात आले आहे. युवा खेळाडू शुभमन गिल आणि महंमद सिराज यांना पहिल्यांदाच करारात स्थान मिळाले असून त्यांना क श्रेणीनुसार वर्षाला एक कोटी रुपयांचे मानधन मिळेल.
मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर याला क श्रेणीतून ब श्रेणीत बढती मिळाली आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात शार्दूलने मोलाची भूमिका बजावली होती. सध्या भारतीय संघातील स्थान गमावलेला फलंदाज केदार जाधव याला करारबद्ध करण्यात आलेले नाही.
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा ब श्रेणीत, फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचीही अ श्रेणीतून क श्रेणीत घसरण झाली आहे. तसेच शिखर धवन तसेच कसोटीपटू रविचंद्रन अश्विन आणि चेतेश्वर पुजारा यांनी अ श्रेणीतील स्थान कायम राखले आहे.
पृथ्वीचे नुकसान
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुमार कामगिरी केलेल्या पृथ्वी शॉ याचे भारतीय संघातील स्थान गेले. मायदेशी परतल्यावर त्याने देशांतर्गत स्पर्धेत तसेच सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत जरी धावा केल्या असल्या तरीही बीसीसीआयने वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून त्याला बाहेरच ठेवले आहे. याचाच अर्थ त्याचे आर्थिक नुकसान तर होणारच आहे पण त्याहीपेक्षा त्याला आता कितीही सरस कामगिरी केली तरीही भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
करारबद्ध खेळाडू –
अ प्लस – (7 कोटी) : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह. अ (5 कोटी) : रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, लोकेश राहुल, महंमद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या. ब (3 कोटी) : वृद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, मयंक आग्रवाल. क (1 कोटी) : कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्सर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, महंमद सिराज.