पिंपरी – सायंकाळी सहा वाजल्यानंतर व्यवसाय बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून चार फेरीवाल्यांनी पोलिसांना मारहाण केली. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दोन फेरीवाल्यांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चिखली येथे घडली.
मोहम्मद इरफान अब्दुलहन्नान बागवान (वय 24), मोहम्मद इमरान अब्दुल रहेमान शेख (वय 22, दोघेही रा. राजवाडा जवळ, चिखलीगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक दीपक भानुदास मोहिते यांनी शुक्रवारी (दि. 16) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिसावर हल्ला करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजल्याच्या नंतर मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार पोलीस नाइ्रक मोहिते हे दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगत होते. त्यानुसार त्यांनी फळविक्रेते बागवान, शेख यांनाही दुकान बंद करण्यास सांगितले.
या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच त्यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. या मारहाणीत मोहिते यांच्या तोंडाला मार लागला आहे. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. शेख आणि बागवान या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख याबाबत अधिक तपास करीत आहेत.