रांजणगाव गणपती -पुण्यातील एका नामांकित हॉंस्पिटलमध्ये करोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णाने बिल कमी होण्यासाठी रांजणगावचा पत्ता सांगितल्याने ग्रामस्थांसह सर्व प्रशासकीय यंत्रणांची चांगलीच दमछाक झाली. मात्र, संबंधित रुग्णास सरकारी हिसका दाखवताच आपण रांजणगावचा खोटा पत्ता दिल्याचे सांगितल्याने रांजणगावकरांसह प्रशासकीय यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर रांजणगाव करोनामुक्त असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
रांजणगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहल घोडेवार म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रांजणगाव येथे एक करोना रुग्ण सापडला असल्याची माहिती देण्यात आली. संबंधित नागरिकाशी संपर्क साधला असता तो विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना वेगवेगळी माहिती देत असल्याने अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते.
मात्र, संबंधित बाधितास सरकारी हिसका दाखवताच बिल कमी होण्यासाठी आपण रांजणगावचा पत्ता सांगितला आहे, असे सांगितले. पुण्यातील रुग्णालयात मावशीला भेटण्यासाठी मुंबईहून आलो असता आईला त्रास होऊ लागल्यावर तपासणी केली असता आईला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
या बाधिताने तपासणी केली असता तोही पॉझिटिव्ह आढळला. उपचारासाठी रुग्णालयाने बिल आकारले होते. ते बिल कमी करण्यासाठी रांजणगाव येथे वास्तव्य केले असल्याचा बनाव रचला. मात्र, शासकीय यंत्रणेने तपास केला असता रुग्ण खोटी माहिती देत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्याला कायदेशीर हिसका दाखवताच त्याने खरी माहिती दिली. त्यानंतर रांजणगावकरांना दिलासा मिळाला आहे.