पिंपोडे बुद्रुक – घिगेवाडी (ता. कोरेगाव) येथे मुंबईहून (बदलापूर) आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यात पती, पत्नी, दोन मुले व एका वृद्धाचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील पाच जण बाधित आढळून आल्याने घिगेवाडी ग्रामस्थांना धडकी भरली असून प्रशासनाने गाव सील केले आहे.
बदलापूरहून दि. 5 जूनच्या रात्री पाच जण त्यांच्या मूळगावी घिगेवाडी येथे आले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. या रुग्णाच्या घरापासून अर्धा किलोमीटरचा परिसर कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आला असून पोलिस व प्रशासनाने मंगळवारी दुपारी हे गाव सील केले. सोनके, वाघोली व पिंपोड्यानंतर आता जेमतेम सव्वाशेच्या आसपास उंबरठा असणाऱ्या या छोट्याशा वाडीत मुंबईकरांमुळे करोनाची एन्ट्री झाली आहे. संबधित रुग्णाच्या पत्नीला सर्वप्रथम त्रास जाणवत होता. त्यामुळे सर्वांनाच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाने पाठवलेल्या स्त्रावाचा रिपोर्ट रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला.
महिलेचा पती पिंपोडे येथे बसस्थानक परिसरातील एका मेडिकल व फळांच्या स्टॉलवर येऊन गेल्याने या दोघांनाही क्वारंटाइन होण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य व महसूल विभागाने ग्रामस्थांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, संबधित कुटुंबाने विनापरवाना प्रवास करत जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने ग्राम दक्षता समितीने त्यांच्याविरोधात वाठार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.