मुंबई – मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचे संतापजनक आणि अमानुष कृत्य केले.
विशेष म्हणजे पुण्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कारासारख्या हादरवणाऱ्या तीन घटना ताज्या असताना आता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही अशाप्ररकारची घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाच्या कामकाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
हा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री (9 ऑगस्ट) घडला. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दुसरीकडे पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ती अद्यापही बेशुद्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या प्रकृतीसाठी डॉक्टर मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
साकीनाका खैरानी रोड येथे काल रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी ती गंभीररीत्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.