अबुधाबी – कॅरन पोलार्ड व जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला 6 बाद 135 धावांवर रोखले. आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील येथे सुरू असलेल्या दुसऱ्या पर्वातील महत्त्वाच्या लढतीत मुंबईने विजयाच्या आशा पल्लवित करताना प्ले ऑफमध्ये पात्र ठरण्यासाठी सरस कामगिरी केली आहे.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या मस्टविन सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय बुमराह व पोलार्डने योग्य ठरवला. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने मनदीप सिंगच्या साथीत चांगली सुरुवात केली. मात्र, संघाच्या 36 धावा झाल्या असताना मनदीप कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर चांगला खेळत असतानाही राहुल पोलार्डचा बळी ठरला.
पोलार्डने सर्वांत आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याचाही अडसर दूर केला. त्याचवेळी एडन मार्करमने मात्र एक बाजू लढवत ठेवली. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला निकोलस पूरनही अपयशी ठरला. त्याला बुमराहने बाद केले. त्यानंतर दीपक हुडाने मार्करमला साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. मात्र, मार्करम अर्धशतकाजवळ आलेला असताना बाद झाला. त्याने 42 धावांच्या खेळीत 29 चेंडूत 6 चौकार फटकावले.
हुडाही चांगला खेळत होता. त्यालाही बुमराहनेच बाद केले व अखेरच्या षटकात धावांचा वेग वाढणार नाही याची काळजी घेतली. हरप्रीत ब्रार व नाथन एलिस यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. मुंबईकडून कॅरन पोलार्ड व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. कृणाल पंड्या व राहुल चहर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक : पंजाब किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 135 धावा. (एडन मार्करम 42, दीपक हुडा 28, लोकेश राहुल 21, कॅरन पोलार्ड 2-8, जसप्रीत बुमराह 2-24).